Maharashtra Budget 2023 Anganwadi : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ; 20 हजार पदे भरणार
Maharashtra Budget 2023 Anganwadi : अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.
Maharashtra Budget 2023 Anganwadi : आशा स्वयंसेविका (ASHA), अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi Workers) मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्प सादर करताना अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदींच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा फडणवीसांनी केली. त्याशिवाय, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. यामध्ये मानधन वाढीचा कळीचा मुद्दा होता. त्याबाबत राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. काही दिवसापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यावेळी मानधन वाढ आणि इतर मुद्यांवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली होती. सरकारच्या आश्वासनानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. त्यानंतर, आज अर्थसंकल्पात राज्य सरकारने मानधनवाढीची घोषणा केली.
मानधनात किती वाढ?
- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये करण्यात आले आहे.
- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये करण्यात आले.
- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये इतके करण्याची घोषणा
- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये होणार
- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये होणार
- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पाचवी ते सातवीमधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 1000 वरुन 5000 रुपये करण्यात आली आहे. तर, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 1500 वरुन 7500 रुपये करण्यात आली आहे. त्याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत मिळणार आहे.
शिक्षणसेवकांच्या मानधन वाढ
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शिक्षणसेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचं मानधन 6000 वरुन 16,000 रुपये करण्यात आले आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात 8000 वरुन 18,000 रुपये करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन 9000 वरुन 20,000 रुपये करण्यात आले आहे. त्याशिवाय पीएमश्री 816 शाळांना 5 वर्षांत 1534 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.