(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amit Thackeray : नाशिक मनसेला अमित ठाकरे देणार बूस्ट, चार दिवसांचे महासंपर्क अभियान
Amit Thackeray : राज ठाकरेंचे (Raj Thackeray) चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) हे देखील नाशिक दौऱ्यावर येणार असून मनसेच्या (MNS) युवा कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.
Amit Thackeray : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांची मांदियाळी असून आदित्य ठाकरे (Aditya Thakaray), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thakaray) हे देखील नाशिक दौऱ्यावर येणार असून मनसेची विस्कटलेली घडीसह मनसेच्या (MNS) युवा कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.
गेल्या काही महिन्यातील घडामोडी बघता राजकीय युवा नेतुत्व पक्ष बांधणीला मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात आदित्य ठाकरे यांनी दोन दिवस तळ ठोकून शिवसैनिकांना संबोधित केले. नाशिक शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर आदित्य ठाकरे यांनी नाशकात मेळावे व बैठका घेतल्यानंतर आता त्यांचे चुलत बंधू तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे महासंपर्क अभियानाचा भाग म्हणून 6 ते 9 ऑगस्ट असे चार दिवस नाशिक दाैऱ्यावर येत आहे.
शिवसेनेची (Shivsena) विस्कटलेली घडी बसविण्याचे काम आदित्य ठाकरे यांनी घेतल्यानंतर आता काही काळापासून राजकीय वर्तुळात फारसे सक्रिय नसलेल्या मनसेने पुन्हा एकदा मोट बांधली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले पूत्र अमित यांना राज्यव्यापी दाैऱ्यावर पाठवले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे हे राज्यभर फिरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ते नाशिक दौऱ्यावर येत असल्याचे समजते. तत्पूर्वी मनविसे अध्यक्ष असलेले ठाकरे यांनी यापूर्वी काेकण तसेच मुंबईतील काही भागात दाैरे करून युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काही महाविद्यालयात जावून तेथील विद्यार्थ्याचे प्रश्नही जाणून घेतले.
दरम्यान, आता अमित हे नाशिकमध्ये येत असून एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील बांधबंदिस्ती केली जाणार आहे. दाैऱ्यात प्रामुख्याने काही महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहे. विद्यार्थ्यांना मनसे विद्यार्थी संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन देखील केले जाणार आहे.मागील आठवड्यात मनसेचे जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर व समन्वयक सचिन भोसले यांच्याशी मुंबईत चर्चा करण्यात आल्यानंतर दौरा निश्चित करण्यात आला.
असा आहे महासंपर्क अभियान दौरा
दरम्यान अमित ठाकरे हे 06 ऑगस्ट रोजी नाशिकला येणार असून त्यामध्ये इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुका पिंजून काढणार आहेत. त्यानंतर 07 ऑगस्ट रोजी नाशिक ग्रामीणच्या निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव व चांदवड तालुक्यात दौरा करणार आहेत. 08 ऑगस्ट रोजी सटाणा- देवळा, कळवण, दिंडोरी, हरसुल, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर 09 ऑगस्ट रोजी शहरातील नाशिक शहर, पूर्व नाशिक, मध्य नाशिक, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ फिरणार असल्याची माहिती आहे.