(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Rain Update : 'झाले मोकळे आकाश' नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यात तीन दिवसांनी सूर्यदर्शन, पेरण्यांना वेग
Nashik Rain Update : नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस थांबला असून तीन दिवसांनी सूर्यदर्शन झाले आहे.
Nashik Rain Update : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक (Nashik) शहर परिसरात जिल्ह्यातील काही भाग पावसाने झोडपून काढले. मात्र आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली असून तीन दिवसांनंतर सूर्यदर्शन झाले आहे. त्यामुळे नाशिक (Nashik Rain) शहरासह जिल्ह्यातील काही भागात उन्हाची तिरीप पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पावसामुळे अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या होत्या, त्या पेरण्यांना आणि पेरलेल्या पिकांना पोषक वातावरण मिळाले आहे.
नाशिकसह जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने जोरदार (rain Update) हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागातील नदीनाल्यांना पूर आला. नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा (Surgana) तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे भात लागवडीलामोठा वेग आल्याचे पाहायला मिळाले. मात्र पावसाची संततधार सुरु असल्याने शेती कामांत अडचण निर्माण झाली होती. अखेर आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा शेतीकामांना वेग आला आहे. अनेक भागातील पेरण्या (Sowing) खोळंबल्या होत्या, त्यांना वेग आला आहे. पावसाने शेतात पाणी साचल्याने भात पिकावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. आज वातावरणात बदल होऊन ऊन पडल्याने पिकाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पिके जोर धरु लागली आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), इगतपुरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचा जोर वाढला होता. गुरुवारच्या मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावत शनिवारी रात्रीपर्यंत पाऊस सुरुच होता. मात्र आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली असून सगळीकडे मोकळे आकाश झाले आहे. त्यामुळे आज रविवारची सुट्टी (Sunday Weekend) घालविण्यासाठी नाशिककरांसह पर्यटक बाहेर पडले आहेत. त्याचबरोबर पावसाने उसंत दिल्याने नाशिकच्या बाजारात नागरिकांनी गर्दी केली असून तीन दिवसानंतर सूर्यदर्शन झाल्याने नागरिकही घराबाहेर पडू लागले आहेत.
मागील 24 तासांतील पाऊस
नाशिकसह मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) घाटमाथ्यावर तसेच विदर्भात तीन दिवस जोरदार तर मराठवाड्यात ठराविक ठिकाणी हलक्या स्वरुपात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान शनिवारी नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्हा जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता इतर भाग तसेच विदर्भात ढगाळ वातावरण होते. नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 22 मिमी पावसाची नोंद करण्यात आले आहे. त्यानुसार पेठ तालुक्यात 96 मिमी, त्र्यंबकेश्वर 76 मिमी, इगतपुरी 85 मिमी पावसाची नोंद मागील 24 तासांत करण्यात आली आहे.