(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : चार महिने 24 तास नोटा छपाई सुरू राहणार? 2000 नोटांवरील बंदीनंतर 500 च्या नोटांची मागणी वाढणार
Nashik News : नाशिकच्या नोटप्रेसमध्ये पाचशेच्या जवळपास 2 हजार 800 मिलियन नोटांची छपाई करण्यात येणार आहे.
Nashik News : दोन हजारांच्या (Two Thousand) नोटा चलनातून बंद होणार असल्याने भविष्यात 500 रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे आणि एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता नाशिकच्या (Nashik) नोट प्रेसमधील 1500 कामगारांना येत्या दोन दिवसात पुढील चार महिन्याच्या कालावधीत नोटबंदीच्या काळाप्रमाणेच 24 तास कामकाज करावे लागणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) 30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटा चलनातून (Note Ban) रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला असून 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून दोन हजारांच्या नोटा नागरिकांना बँकेत जाऊन बदलता येणार आहेत. त्याचबरोबर आता पाचशेच्या नोटांची अधिक गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या नोटप्रेसमध्ये पाचशेच्या जवळपास 2 हजार 800 मिलियन नोटांची छपाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 500 रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे. काही महिन्यापूर्वी अर्थ मंत्रालयाने नाशिक करन्सी नोट प्रेसला 500 रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचे उद्दिष्ट दिले होते. एप्रिलपासून आतापर्यंत 30 कोटी नोटांची छपाईही झाली आहे. आता येत्या काही दिवसांतच दोन हजार रुपयांची नोटच चलनातून बाद होत असल्याने एक दोन हजाराची नोट बदलून देण्यासाठी पाचशे रुपयांच्या 4 नोटा लागणार असल्याने 500 च्या नोटांची मागणी वाढणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळातही हे उद्दिष्ट कामगार पूर्ण करतील असा मजदूर संघाच्या नेतृत्वाला विश्वास आहे. दरम्यान, दोन हजारांच्या नोटांची छपाई ही 2018-2019 या आर्थिक वर्षापासूनच बंद करण्यात आली होती, ती रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर आणि सालगोणी येथील नोट प्रेसमध्ये होत होती.
साडेसात हजार मिलियन नोटांची गरज
त्याचबरोबर नाशिकच्या नोटप्रेसने (Indian Note Press) नोटबंदी काळात नोटप्रेसच्या कामगारांनी महत्वाची भूमिका बजावत जवळपास दोन वर्षे दिवसरात्र मेहनत घेतली होती. तयावेळी दोनशे आणि पाचशेच्या अंदाजे दहा हजार मिलियन नोटांची छपाई केली होती. सध्या दोन हजारांच्या अंदाजे 1 हजार 833 मिलियन नोटा बाजारात आहेत आणि हे बघता पाचशेच्या जवळपास साडेसात हजार मिलियन नोटांची भविष्यात गरज भासणार आहे. म्हैसूर, सालभोनी, देवास आणि नाशिकमध्ये या नोटा तयार केल्या जाणार असून येत्या चार महिन्यात 2 हजार 800 मिलियन नोटाची छपाई एकट्या नाशिक नोटप्रेसमध्ये होणार आहे.