(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Ramkunda : नाशिकच्या रामकुंडावर अस्थी विसर्जन करताय? अस्थींचं विदारक दृश्य पाहिलं का?
Nashik Ramkunda : नाशिकच्या रामकुंडावर राजकीय नेते, अभिनेते आपल्या नातेवाईकांच्या अस्थी विसर्जनासाठी येत असतात.
Nashik Ramkunda : नाशिक (Nashik) शहर हे धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. यामुळे देशभरातून लाखो भाविक नाशिक नगरीत पर्यटनासह अनेक धार्मिक विधीसाठी येत असतात. नाशिकच्या रामकुंडावर राजकीय नेते, अभिनेते आपल्या नातेवाईकांच्या अस्थी विसर्जनासाठी येत असतात. मात्र याच रामकुंडावर अस्थी विसर्जनाचे विदारक दृश्य समोर आले आहे.
नाशिकची जीवनवाहिनी म्हणून गोदावरी (Godavari) नदीला अनन्य साधारण महत्व आहे. गोदावरी नदी नाशिक शहरातून वाहत जात पुढे जाते. या गोदेच्या तीरावर नाशिक वसले आहे. तर शहरातील पंचवटीसह इतर परिसर ऐतिहासिकदृष्टया महत्वाचा मानला जातो. याच पंचवटी गोदातीरी रामकुंड (Ramkunda) पाहायला मिळते. या रामकुंडात अस्थी विसर्जन करणे हा देशभरातील भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून देशभरातील भाविक तथा नागरिक रामकुंडावर अस्थी विसर्जनाला येत असतात. मात्र सद्यस्थितीत स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त येथील रामकुंड अस्थी विसर्जनाला हानी पोहोचल्याचे दिसून आले आहे.
नाशिक शहरातून वाहणाऱ्या गाेदावरीच्या विविध कुंडांमध्ये माेठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे महापालिकेने विशेष स्वच्छता माेहीम राबविण्यास सुरुवात केली. यावेळी रामकुंडातील पाणी अडवल्याने विसर्जित झालेल्या अस्थींचा खच दिसू लागला. परिणामी ज्या भक्तीभावाने भाविक अस्थींचे विसर्जन करतात, त्याची हेळसांड होत असल्याचे समोर आले आहे. रामकुंडावर मृत व्यक्तींच्या अस्थींचे रामकुंडातील अस्थी वलय कुंडात विसर्जन केले जाते. कारण मृत व्यक्तींच्या अस्थींचे विघटन होते. परंतु गोदावरी नदी पात्रात तळ सिमेंट काँक्रिट झाल्यानंतर कुंडात रासायनिक प्रक्रिया होत नाही. त्यामुळे मृत व्यक्तींच्या अस्थींचे विघटन होत नसल्याने अस्थींचा खच रामकुंड जवळ साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांच्या भावनांना ठेच पोहचवली जात असल्याचे दिसून येत आहे.
रासायनिक प्रक्रिया होत नाही...
रामकुंडालगत असलेल्या वस्त्रांतरगृहामुळे रामकुंडावर अर्थात पाण्यात सूर्यप्रकाश येण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच येथील अस्थींचे विघटन होत नसल्याचे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी सांगितले. तसेच रामकुंडात केलेल्या सिमेट काॅंक्रिटमुळेही अस्थी विघटनास अडथळे येत असल्याचेही ते म्हणाले. रामकुंडातील पाण्याचा प्रवाह थांबविण्यात आल्याने अस्थी विघटनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नदी पात्रात तळ सिमेंट काँक्रिट झाल्यानंतर कुंडात रासायनिक प्रक्रिया होत नाही. त्यामुळे अस्थींचे विघटन होत नाही. अस्थींचा खच साचलेला असतो. कुंड स्वच्छतेच्या नावाखाली या अस्थी कचरा डेपोत जातात. हे थांबवायचे असेल तर रामकुंडातील काँक्रिट काढणेच गरजेचे असल्याचे जानी म्हणाले.