(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Ganeshotsav : खबरदार! डीजे वाजवाल तर... नाशिकमध्ये पोलिसांकडून गणेशोत्सव नियमावली जाहीर
Nashik Ganeshotsav : नाशिक (Nashik) शहर परिसरात (Ganapati Bappa) बाप्पाचं आगमन होत असताना गणेशोत्सवात डीजे (DJ) वाजविण्यावर शहर पोलिसांनी बंदी घातली आहे.
Nashik Ganeshotsav : नाशिक (Nashik) शहर परिसरात बाप्पाच्या (Ganapati Bappa) आगमनासाठी मोठा उत्साह असून सर्वत्र ढोल ताशांसह बाप्पाचं आगमन होत असताना गणेशोत्सवात डीजे (DJ) वाजविण्यावर नाशिक पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे नाशिककरासंह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हिरमोड होतो कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या परिपत्रकात गणेश उत्सव साजरा करताना डीजे साउंड सिस्टीम यांचा वापर करण्यात येऊ नये असे नमूद केले आहे.
गणेशोत्सव (Ganeshotsav) संपूर्ण राज्यात मोठ्या थाटामाटात व दिमाखाने साजरा केला जातो. परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सदरचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला गेला होता मात्र यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव संपूर्ण राज्यासह नाशिक शहरात साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज झाले असून गणेशाचे आगमन जोरदार होत आहे. दरम्यान नाशिकच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव सुरक्षित पार पाडण्याकरता चोख बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक शहरात सुमारे 375 सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून सर्व सार्वजनिक गणेशोत्सवांचे ठिकाणी फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदार यांच्या खेरीज धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्र येथील शंभर पुरुष पोलिस अंमलदार व 50 महिला पोलीस अंमलदार तसेच 800 पुरुष होमगार्ड 250 महिला होमगार्ड यांच्यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आला आहे. गणेश विसर्जनच्या दिवशी गणेश विसर्जना करतात त्या ठिकाणी गणेश मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था महानगरपालिका विभागाकडून करण्यात आले आहे. सदर ठिकाणी जीव रक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
याखेरीस सुमारे 42 ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जना करता कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. संबंध उत्सवाच्या दरम्यान पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या पर्यवेक्षक पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव दरम्यान पेट्रोलिंग बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने घराबाहेर पडताना कुटुंबातील सर्वांनी एकत्र बाहेर पडणे टाळावे. त्याप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी दाग दागिने पर्स पाकीट व्यवस्थित सांभाळावे. तसेच सोबत असलेल्या लहान मुलांना एकटे सोडू नये. गणेश उत्सव साजरा करताना डिजे साऊंड सिस्टिम यांचा वापर करण्यात येऊ नये व दोन्ही प्रदूषण टाळावे, अशा सूचना नाशिक पोलिसांनी नाशिककरांना केल्या आहेत.
अडचण आल्यास इथे साधा संपर्क
गणेशोत्सव काळात नाशिक शहर पोलीस हे नागरिकांच्या मदतीकरता महत्त्वाच्या चौका चौकात उपलब्ध राहणार असून काही मदतीची आवश्यकता असल्यास 112 क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून काही संशयित हालचाली आढळून आल्यास किंवा गुन्हेगारी संबंधित माहिती मिळाल्यास पोलीस नियंत्रणात कक्षात कळवावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच सर्व नागरिकांनी गणेशोत्सव पर्यावरण पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणेश मूर्तीचा वापर करून शांततेत व सुरक्षितरीत्या साजरा करून प्रशासनात सहकार्य करण्याबाबत नाशिक शहर पोलीस दलावर तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
डीजेवर बंदी
दरम्यान दोन वर्षानंतर शहरात गणेशोत्सवाचे जोरदार आगमन होत असून यंदा धुमधडाक्यात लाडक्या गणरायाचे आगमन स्वागत करण्यात येत आहे. यंदा सर्वच गणेश भक्ताना गणरायाचे जोरदार स्वागत करायचे असल्याने प्रशासनाने कोणतीही आडकाठी न आणता गणेश मंडळांना सवलत द्यावी, अशी भूमिका गणेश मंडळाची होती. त्यामुळे यंदा प्रशासना देखील मंडळांना सहकार्य केल्याचे दिसून आले. मात्र गट आठवड्यापासून डीजे संदर्भात काय निर्णय होईल याकडे लक्ष लागून असताना गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांनी परिपत्रक जाहीर करून डीजे साउंड सिस्टीम लावण्यावर मज्जाव करण्यात आला आहे.