(Source: Poll of Polls)
Nashik Sambhajiraje : राज्यपालांना तेव्हाच हटवायला पाहिजे होतं, आता जे चुकणार त्यांना ठोकणार; संभाजीराजेंनी दिला इशारा
Nashik Sambhajiraje : राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाला हे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी सुनावले आहे.
Nashik Sambhajiraje : महाराष्ट्र महापुरुषांच्या योगदानासाठी ओळखला जातो. मात्र आक्षेपार्ह वक्तव्यांनी महाराष्ट्राची नाचक्की झाली. ज्या पद्धतीने राज्यपालांचा (Bhagatsingh Koshyari) राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी सुनावले आहे. कोश्यारींना दोन महिन्यांआधीच हटवणं गरजेचं होतं, असे देखील संभाजीराजे म्हणाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ते आज नाशिकमध्ये असताना माध्यमांशी बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राला वेगळी परंपरा लाभलेली आहे, मात्र राज्यपालांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नाचक्की केली. त्यावरून राज्यात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. आज ज्या पद्धतीने राजीनामा मंजूर करण्यात आला आहे, हे उशिरा सुचलेलं शहाणपण असून राज्यपालांना दोन महिन्यांपूर्वीच हटवणं गरजेचे होत असे मत संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले की, आता जे नवीन राज्यपाल नियुक्त झाले आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल की महाराष्ट्राला वेगळा इतिहास आहे. महाराष्ट्राने विविध नेते महापुरुष घडवले आहेत. राज्यपाल हे पद घटनात्मक पद असून राज्यातील लोक हे त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची परंपरा ही देशासह देशाबाहेर नेण्याची जबाबदारी ही नव्या राज्यपालांनी घेणं महत्त्वाचं आहे. जुन्या राज्यपालांनी ज्यावेळी अशी वक्तल्य केली, त्याचवेळी हा निर्णय घेणे अपेक्षित होतं, अनेकांनी त्यावेळी राज्यपालांना विरोध केला, त्यांना कोणी पाठीशी घातलं, त्यांना कोणी सपोर्ट केला. हे सगळ्यांना माहिती आहे. आता राज्यपालांचा राजीनामा मंजूर केला हे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे.
नवीन राज्यपालांना आमच्या शुभेच्छा, आमची त्यांना विनंती आहे की, महाराष्ट्राला एक ओळख आहे. जुन्या चुका ज्या झाल्या, त्या त्यांनी लक्षात ठेवाव्या..आता नवीन राज्यपाल आले आहेत. त्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवूयात. घटनात्मक पद असल्याने काही मर्यादा आहेत, त्या सांभाळणे महत्वाचे असते..राज्यपाल हा कुण्या पक्षाचा नसतो. त्यामुळे पक्ष विरहित त्यांचं वर्तन असणं आवश्यक असतं. यापुढे जर असं काही झालं तर स्वराज्य मैदानात उतरेल आणि ठोकल्याशिवाय राहणार नाही, जे चुकणार त्यांना ठोकणार असा इशाराच यावेळी संभाजीराजेंनी दिला आहे.