Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर केला आहे. रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.
Ramesh Bais appointed as the new Governor of Maharashtra; President of India has accepted the resignation of Bhagat Singh Koshyari as Governor of Maharashtra. pic.twitter.com/9mco3tSTkI
— ANI (@ANI) February 12, 2023
Ramesh Bais : कोण आहेत रमेश बैस?
रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला.
1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते.
1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.
रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते.
छत्तीसगढ राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते.
रमेश बैस यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे.
वादग्रस्त वक्तव्यानंतर कोश्यारी यांना झाला होता मोठा विरोध
भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. आज अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात चर्चित ठरलेले राज्यपाल ठरले आहेत. त्यांनी सर्वात आधी मुंबईत बोलताना मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढले होते. मुंबई आणि ठाण्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यानंतर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर समर्थ रामदास यांच्याविना छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा ते अडचणीत आले होते. “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं,” अशा आशयाचं वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं. तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत देखील कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात संतापाची लाट तयार झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्रातून निघण्याच्या तयारीत! पण त्यांची 'ही' वादग्रस्त वक्तव्यं जनता कधीच विसरणार नाही