(Source: Poll of Polls)
Nashik Leopard : नाशिकच्या सिन्नर परिसरात बिबट्या जेरबंद, तर म्हरळ शिवारात शेतकऱ्याचे बिबट्याशी दोन हात
Nashik Leopard : नाशिकच्या (Nashik) मोहाडी शिवारात अडकलेल्या बिबट्याची (Leopard) सुटका केल्यानंतर सिन्नर तालुक्यातील (Sinner) चाडेगाव शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.
Nashik Leopard : नाशिकच्या (Nashik) मोहाडी शिवारात काल तारेत अडकून पडलेल्या बिबट्याची (Leopard) सुटका केल्यानंतर आज सिन्नर तालुक्यातील (Sinnar) चाडेगाव शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. तर कालच सिन्नर जवळील म्हरळ शिवारात बिबट्याने शेळी फस्त करत पळ काढला होता. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे.
नाशिकच्या ओझर (Ojhar) जवळील मोहाडी शिवारात तारेच्या कुंपणात बिबट्या अडकून असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाने तातडीने रेस्क्यू टीमला पाचारण करत संबंधित बिबट्याला डार्टद्वारे बेशुद्ध करून तारेच्या कुंपणातून बाहेर काढले. त्यानंतर आज अधिवास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर परिसरातील चाडेगाव शिवारात आज बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. चाडेगाव शिवारातील शेतकरी बबन कारभारी मानकर मालकी गट नंबर 334 मानवी वस्ती जवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास रेस्क्यू करून ताब्यात घेतला असून सुरक्षित रित्या ठेवण्यात आलेला आहे.
कुंपणात अडकलेल्या बिबट्याची सुटका
ओझर शिवारात (Ojhar) मोहाडी व साकोरे या गावच्या हद्दीवर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) कंपाऊंड वॉलला तारेचे कुंपण आहे. या कंपाउंड वॉलला एका ठिकाणी भगदाड पडले असल्याने येथील काही नागरिकांनी शिकारीसाठी तारेचे कुंपण घातले होते. या भगदाडातून जात असलेला बिबट्या कुंपणात अडकल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ ही बाब वनविभागाला कळविण्यात आली. यावेळी चांदवडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी वाघमारे, दिंडोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जोशी, वनपाल डी टी चौधरी, वनपाल अशोक काळे, वनपाल देवरे, यांच्यसह पथक घटनास्थळी पोहचून बिबट्याची सुटका केली.
म्हरळ शिवारात शेळीचा फडशा
सिन्नर तालुक्यातील पूर्व भाग असलेल्या मरळ शिवारात काल दुपारच्या सुमारास घोलप वस्तीवर भर दुपारी बिबट्याने शेळीवर झडप घातली. यावेळी शेळीच्या आवाजाने शेतकरी आल्याने त्याची पाचावर धारण बसली. मात्र न डगमगता त्याने बाजूला असलेली काठी बिबट्यावर उगारत आरडाओरड केली. बिबट्याने लागलीच घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र बिबट्याचा हल्ल्यात शेळीचा मृत्यू झाला.
बिबट्याचा वावर वाढता वाढे!
नाशिक शहरासह जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्या आणि नाशिक हे जणू समीकरणच झाले आहे. दर आड दिसाला नाशिक शहर परिसरात कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला, किंवा बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. काही दिवसांपूर्वी बोरगड परिसरात बिबट्याचा हल्ल्याची घटना घडली होती. लहवीत येथे पत्रा तोडून बिबट्या घरात कोसळला होता. तयार काल बिबट्याचा तारेच्या कुंपणात अडकला. त्यानंतर सिन्नर परिसरातील म्हरळ शिवारात बिबटयाने शेळी फस्त केली. या सारख्या घटनांनी बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे.