Nashik Ramdas Athawale : आम्हीही शिवसेना-भाजप युतीत, तीन जागा हव्यातच, रामदास आठवलेंची मागणी
Nashik Ramdas Athawale : शिवसेना -भाजप जागा वाटपावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वाचं वक्तव्य केले आहे.
Nashik Ramdas Athawale : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या जागावाटपाच्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी बावनकुळे यांना सुनावले आहे. आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत का? असा सवाल उपस्थित केल्याने हा प्रश्न चांगलाच पेटणार आहे. मात्र आता प्रश्नावर रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी दोघांची समजूत काढणार असून जागा वाटपाबाबत योग्य तो निर्णय व्हायचा असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आज सकाळपासूनच बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर चांगलाच गदारोळ झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीच्या जागा वाटपबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून भाजप-शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहे.
आम्हाला तीन जागा हव्यात...
दरम्यान रामदास आठवले या वादावर म्हणाले की, भाजपने मत व्यक्त केलंय मात्र आरपीआय, शिवसेना आणि भाजप सोबत राहिली तरच फायदा असल्याचे आठवले म्हणाले. सध्याच्या वादावरून रामदास आठवले म्हणाले की, बावनकुळेंच्या 50 जागांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असतील तर मी मध्यस्थी करून नाराजी दूर करेन. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही कायम राहणार आहेत. एक मंत्रीपद आणि एक एमएलसी मिळावी अशी आमची अपेक्षा असून लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेने तीन जागा द्याव्यात, यात एक शिर्डी आणि एक मुंबई आणि एक इतर जागा मिळावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
नाशिक महापालिकेत 22 जागा मागू....
सध्याच्या संपावर म्हणाले रामदास आठवले की, गोरगरिबांचे, रुग्णांचे हाल होत असल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 28 मे रोजी शिर्डीत अधिवेशन असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बोलवणार आहोत. व्यापक पक्षबांधणी हा यामागील उद्देश असल्याचे आठवले म्हणाले. तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांचा कधीही विरोध केला नाही. त्याचबरोबर आगामी नाशिक महापालिकेत 22 जागा मागू, असं ते म्हणाले. नाशिक दौऱ्यावर आलेल्या रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निवडणुका लढणार असल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रीपदाबाबतही मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात आठवले यांना किती जागा आणि मंत्रिपद मिळतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.