Nashik Note Press : नोटा गहाळ झाल्याच्या अफवाच, गैरसमजातून हा प्रकार, करन्सी नोट प्रेसकडून स्पष्टीकरण
Nashik Note Press : नोटा गहाळ प्रकरणावर नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी करन्सी नोट प्रेसने महत्वाचा खुलासा केला आहे.
Nashik Note Press : कुठे, किती नोटा छापल्या? किती रवाना झाल्या? याची संपूर्ण नोंद असते. आजही कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते. त्यामुळे एकही नोट गहाळ होऊ शकत नाही. सध्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे हा तांत्रिक मुद्दा असून गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण इंडिया सिक्युरिटी करन्सी नोट प्रेस (Nashik Currency Note Press) मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे (Jagdish Godse) यांनी दिले आहे.
नाशिकसह (Nashik) देवास (Devas) आणि बंगळुरू मधील नोट प्रेसमधून छापण्यात आलेल्या 82 हजार कोटीच्या नोटा रिझर्व्ह बँकेपर्यंत (Reserve Bank) गेल्याच नाही, अशी एका वृत्त पत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानं देशभरात खळबळ उडाली होती. मात्र हा तांत्रिक मुद्दा असून गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण इंडिया सिक्युरिटी करन्सी नोट प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी दिले आहे. या संदर्भात आरटीआय (RTI) कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात माहिती विचारली होती, त्यानुसार ही माहिती उघडकीस आली. त्यानुसार नोट प्रेसकडून रिझर्व्ह बँकेला 31 मार्च या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवसापर्यंत नोटांचा पुरवठा केला जातो, असे सांगण्यात आले आहे.
यावेळी जगदीश गोडसे म्हणाले की, रस्ता मार्गाने आणि रेल्वेने ही नोटांचा पुरवठा होतो. त्यामुळे काही नोटा दोन तीन दिवसांनी पोहचतात, त्याची नोंद एप्रिल महिना म्हणजेच पुढील आर्थिक वर्षांत केली जाते, जी बातमी आहे, त्यात केवळ नोटा रवाना झाल्याची माहिती आहे. त्या कधी पोहचल्यात्याची माहिती नाही. रिझर्व्ह बँकेची पुढील सहा सात वर्षांची नोटांची नोंद आणि डिसपॅच झालेल्या नोटांची तुलना केली तर तरी एकच रक्कम आहे. त्यामुळे नोटा गहाळ झाल्यात असे म्हणणे चुकीचे आहे. कुठे किती नोटा छापल्या? किती रवाना झाल्या? याची संपूर्ण नोंद असते. आजही कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते. त्यामुळे एकही नोट गहाळ होऊ शकत नाही. सध्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे नाशिक प्रेसकडून खुलासा केला जात असल्याचे गोडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
दरम्यान काही दिवसांपूर्वी नोटा गहाळ झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. यावर आज नाशिक नोट प्रेसकडून खुलासा करण्यात आला आहे. तत्पूर्वी या प्रकरणावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या होत्या. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते की, नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमध्ये छापलेल्या 1761 दशलक्ष नोटा रिझर्व बँकेमार्फत पोहोचल्याच नाहीत. या सर्व नोटा राज्यात आणि देशात फिरत आहेत. या नोटांची चोरी झाली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर छगन भुजबळ म्हणाले की, मी वर्तमानपत्रात वाचले, त्यावेळी माझा विश्वास बसत नव्हता. प्रकरण खोटे असेल, तर जाहीर करुन टाकले पाहिजे. नाही सांगत असतील आणि तथ्य असेल, तर जाब विचारायला पाहिजे. तर यावर केशव उपाध्ये म्हणाले की, आरोप होत असतात.