Trimbakeshwer Yatra : नाथांकड काहीच मागणं नाही, जीव हाये तवर वारी चुकणार न्हाई! त्र्यंबकच्या वारीतील आजीबाईची गोष्ट
Trimbakeshwer Yatra : आजी म्हणाल्या, बाळा गेल्या वीस वर्षांपासून वारीला येतेय, पण नाथांकड कधीच काही मागितलं नाही.
Trimbakeshwer Yatra : बाळा, वारी झाली, नाथांचं दर्शन झालं, आता काहीच नको, आता पुढल्या वरिस नई बी येता, आलं तरी चालेल, जवर जीव हाये तवर वारी चुकणार नई, अशा शब्दांत वारीतला आंनद 70 वर्षीय आजीबाईंनी व्यक्त केला.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer Yatra) नगरी भाविकांनी फुलून गेली आहे. लाखो वारकऱ्यांनी आज सकाळपासून दर्शन घेण्यासाठी रीघ लावली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले असून शहरात ठिकठिकाणी दिंड्यानी राहुट्या उभारल्याचे दिसून येत आहे. याच वारकरी भाविकांतील एका आजीबाईंशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वारीच तोंडभरुन कौतुक केले. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील आधारवड येथील दिंडीतील रखमाई बरे यांनी नाथांचं दर्शन घेतल्यानंतर आपला वारीतील आंनद व्यक्त केला.
'नाथांचं दर्शन झालं, आता काहीच नको'
आजीबाई म्हणाल्या की, "बाळा गेल्या वीस वर्षांपासून वारीला येतेय, पण नाथांकड कधीच काही मागितलं नाही. मधली दोन वर्षे कोरोनात गेली, पण वारी चुकली नाही, मंदिर बंद होतं, पण बाहेरुन का होईना नाथांचं दर्शन घेतलं. औंदा तर सगळं निर्मळ झालं आंनद झाला. यंदा दोन वर्षांनंतर पूर्वीसारखं पायी वारी करता आली. कधी पायी जाऊ अन् कधी नाथांचं दर्शन घेऊ अस झालं व्हतं, आज पहाटे दर्शन बारीत उभं राहिल्यानंतर दोन तासांनी नाथांच्या समाधीवर माथा टेकला. वारी झाली, नाथांचं दर्शन झालं, आता काहीच नको, आता पुढल्या वरिस नई बी येता, आलं तरी चालेल, जवर जीव हाये तवर वारी चुकणार नई."
तर यामागील सहा वर्षांपासून नित्यनेमाने येणारे वारकरी म्हणाले की, नाथांच्या भेटीला आलो की सगळं दुःख विसरुन जातो. इथल्या चैत्यन्यमय वातावरणात यात्रेचे दोन दिवस कसे निघून जातात कळतही नाही. शिवाय अनेक वर्षांपासून दिंडीला येणारे भाविक, वारकरी मित्र भेटत असतात. दोन दिवस एकत्र राहतो, अभंग, गाणी, भजन आदींमध्ये तल्लीन होऊन हरिनामाचा जयघोष करतो.. अन् पुन्हा नाथांना पुढल्या वर्षी भेटी असं सांगून घरची वाट धरतो...
तीन मुक्कामानंतर दिंडी त्र्यंबकेश्वरला पोहोचते
त्र्यंबकेश्वर यात्रेला लाखो भाविक येतात. अनेकजण नाथांच्या भेटीसाठी येतात, तर अनेक वारकरी दरवर्षी भेटत असलेल्या वारकऱ्यांना भेटायला येतात. या आजीबाई इगतपुरी तालुक्यातील आधारवड येथील पायी दिंडी सहभागी झालेल्या होत्या. गेल्या दहा वर्षांपासून या गावातून पायी दिंडी सोहळा त्र्यंबकेश्वर व पंढरपूर वारीसाठी आयोजित केला जातो. तीन मुक्कामानंतर ही दिंडी त्र्यंबकेश्वरला पोहोचते. कावनई, म्हसुरलीमार्गे त्र्यंबकेश्वर ला पोहचते. या ठिकाणी निवृत्तीनाथांच्या मंदिरामागील सीताराम महाराज आखाडा पटांगणात विसावते. जवळपास अडीचशेहून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी होत असल्याचे एका वारकरी भाविकाने सांगितले. त्र्यंबकेश्वर येथील भाविक भक्त या दिंडीचे दोन दिवसांचा जेवणाचा खर्च बघत असतात. मात्र आचारी हा दिंडीच्या पहिल्या वर्षांपासून वारकऱ्यांसोबत असतो. सकाळ व सायंकाळचे जेवण हा आचारी बनवत असतो.