Nashik News : पुण्याच्या धर्तीवर गोदावरी शुद्धीकरणासाठी नवा प्रयोग, काय आहे 'कल्की'चा डोस?
Nashik News : पुण्याच्या धर्तीवर गोदावरी शुद्धीकरणासाठी नाशिक महापालिकेकडून गोदावरी शुद्धीकरणासाठी नवा प्रयोग राबविण्यात येत आहे.
Nashik News : गोदावरीच्या (Godawari) शुद्धीकरणासाठी महापालिकेकडून वेगवेगळे प्रयोग राबविण्यात येतात. मात्र नाशिककर आणि परिसरातील कंपन्यांकडून राजरोसपणे नाल्यांमध्ये प्रदूषित पदार्थ टाकले जातात. यामुळे नाल्यांवाटे हा सर्व कचरा गोदावरीत मिसळतो, परिणामी गोदावरी प्रदूषित होते. आता यासाठी महापालिकेकडून (Nashik NMC) गोदावरी शुद्धीकरणासाठी नवा प्रयोग राबविण्यात येत आहे.
नाशिकची (Nashik) गोदावरी ही जीवनदायिनी आहे, मात्र सद्यस्थितीला नदीची अवस्था बिकट झाली आहे. शहरातून वाहत असलेल्या गोदावरी नदी अनेक भागातून सांडपाणी मिश्रित मलजल सोडले जाते. यामुळे गटारींमधून वाहून जाणारे सांडपाणी पुढे गोदावरी, नंदिनीसारख्या नद्यांच्या जलप्रदूषणात मोठी भर टाकतात. यासाठी महापालिका प्रशासनाने 'कल्की' नावाच्या नैसर्गिक जैविक 'द्रवरूप पदार्थाचा 'डोस' या नाल्यांना देण्याचे ठरविले आहे. त्याचा शुभारंभ वडाळा- साईनाथनगर रस्त्यावरील नाल्यापासून करण्यात आला. यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह (Rajendra Singh) यांच्या हस्ते कल्की हे द्रवरूप पदार्थ नाल्यातील सांडपाण्यात सोडण्यात आले.
नाशिकच्या शहरी भागातून नैसर्गिक नाले, गटारींमधून वाहून जाणारे सांडपाणी थेट नदीत जाऊन मिसळते. हे सांडपाणी नैसर्गिकरीत्या शुद्धीकरण करण्यासाठी दुर्गंधीमुक्त करण्यासाठी खास द्रवपदार्थ तयार करण्यात आला आहे. पुण्यातील (Pune) वेंगुर्ला येथील औदुंबर अक्षय सहाय्य फाउंडेशनचे अजितकुमार परब यांनी विकसित केलेले 3 हजार वनस्पती आणि जीवाण एकपेशीय वनस्पती, ईष्टसारख्या सूक्ष्मजंतूंचे मिश्रण असलेले शक्तिशाली द्रवरूप पदार्थ म्हणजे 'कल्की' होय. हे द्रवरूप पदार्थ संपूर्णतः जैविक फॉर्म्युला वापरून शोधण्यात आले. नाशिक शहरातील नंदिनी नदीसह नियंत्रणात येतील. वेगवेगळ्या भागातून वाहणारे नैसर्गिक दर्शनीयक्त नाल्यांमध्ये 'कल्की'च्या रूपातील शुद्ध पाणी सोडले जाणार आहे. यामुळे नाल्यांचे संपूर्ण पात्र शुद्ध होऊन नद्यांचे प्रदूषणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. सांडपाण्यातून हवेत मिसळणारे विषारी रासायनिक घटकदेखील नियंत्रणात येतील. शहरातील एका नाल्यात राजेंद्र सिंह यांच्या हस्ते कल्की जैविक शुद्ध पाणी नाल्यात सोडण्यात आले. या डोसमुळे शहरी नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.
पुण्यात राम नदीवर 'कल्की'चा प्रयोग
मागील वर्षी पुणे महापालिकेच्या वतीने राम नदी शुद्धीकरणासाठी कल्कीचा प्रयोग करण्यात आला होता. या प्रयोगाचा सकारात्मक परिणाम याठिकाणी पाहावयास मिळाला. नदीच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली व हवेत सांडपाण्याद्वारे मिसळणाऱ्या विषारी घटकाचे प्रमाणदेखील कमी झाले. नाल्यांमधून येणारी दुर्गंधीही नष्ट झाली. यामुळे या भागातील नागरी आरोग्याच्या समस्याही सुटल्याचे समजते आहे.
दीड हजार लिटर 'कल्की' सोडले नाल्यात
वडाळारोड येथून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यात दीड हजार लिटर कल्की द्रव पदार्थ प्रवाहित करण्यात आले. तत्पूर्वी प्रयोगशाळेच्या सहायकांनी या नाल्यात वाहणाऱ्या सांडपाण्याचे नमुनेही संकलित केले. शनिवारी पुन्हा नमुने घेतले जाणार असून, दोन दिवसांत सांडपाण्यात काय बदल झाला हे तपासण्यात येणार असल्याचे तालुसकर यांनी सांगीतले.