(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : गोदावरी आजारी, उपचाराऐवजी गंध, पावडरचं ब्युटिफिकेशन; जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचं मत
Nashik News : गोदावरीतून नैसर्गिक जलप्रवाह सध्या प्रवाहित नसून नाशिककरांचे सांडपाणी अर्थातच मलजल वाहत आहे.
Nashik News : ब्रम्हगिरी (Bramhgiri) हे गोदावरीचे जन्मस्थळ असून ते सुरक्षित ठेवले तर गोदावरी वाचेल. गोदावरीचा आजार हृदयविकाराप्रमाणे झाला असून याकडे दुर्लक्ष करत उपचाराऐवजी गंध, पावडरचे ब्युटिफिकेशन केले जात आहे. गोदावरीतून नैसर्गिक जलप्रवाह सध्या प्रवाहित नसून नाशिककरांचे सांडपाणी अर्थातच, मलजल वाहत असल्याचे सांगत गोदावरीची बिकट झाल्याचे मत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
नाशिक (Nashik) येथे दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह (Rajendra Singh) आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी राजेंद्र सिंह म्हणाले की, गोदावरी संवर्धन (Godawari) काळाची गरज आहे, कारण गोदावरीमुळे ऐतिहासिक, पौराणिक नाशिकचे अस्तित्व टिकून आहे. गोदावरीच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी अर्थात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सुरू असलेले खाणपट्टे तातडीने बंद करायला हवे. ब्रम्हगिरी पर्वतरांग इको सेन्सिटिव झोन असून या भागातील तीनही तालुक्यांत राखीव वनांचा दर्जा देण्यात आला आहे. नैसर्गिकदृष्ट्या पर्जन्यमानाचे संतुलन, जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी डोंगररांगामधील उत्खनन थांबवायला हवे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राजेंद्र सिंह पुढे म्हणाले की, गोदावरी नदीचा नैसर्गिक जलप्रवाह संपुष्टात आला असून, या नदीतून आता जल नव्हे तर मलजल वाहू लागले आहे. यामुळे गोदावरीची ही अवस्था वर्षानुवर्षे तशीच राहत असल्याचे जरेस पडते, ही मोठी दुर्दैवी बाब असल्याची खंत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आहे. गोदावरी संवर्धनासाठी ज्या ताकदीने शासन, प्रशासनाकडून प्रयत्न व्हायला हवे, ते प्रत्यक्षात होताना दिसत नाही, केवळ चार भिंतीत नित्यनेमाने याबाबत गप्पा होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. गोदावरीचे जन्मस्थळ असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतरांगेत सुरू असलेल्या खाणींमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या उत्खननाविषयीही तीव्र नाराजी व्यक्त केली.
निसर्गाला सुरूंग लावण्यासारखेच...
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये कोठेही उत्खनन करणे हे पर्यावरण आणि निसर्गाला सुरूंग लावण्यासारखेच आहे. यामुळे या भागातील नैसर्गिक जैवविविधता नष्ट होते आणि दुर्मीळ वनस्पती नामशेष होतात. पर्जन्यमानाचे संतुलनही बिघडते. यामुळे त्यावर प्रशासनाने संयुक्तरीत्या गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ब्रह्मगिरी हे गोदावरीचे जन्मस्थळ असून, ते सुरक्षित राहिले तर गोदावरी वाचेल, असेही सिंह यावेळी म्हणाले. गोदावरीला आजार हृदयविकाराप्रमाणे झाला असून, याकडे दुर्लक्ष करत मूळ उपचार करण्याऐवजी प्रशासनाकडून गंध, पावडरसारखे 'स्मार्ट' ब्युटिफिकेशन करत जनतेच्या पैशाची उधळपट्टी एकप्रकारे होत असल्याचा आरोप सिंह यांनी यावेळी केला.