Nashik Crime : नाशिक अत्याचार प्रकरण चौकशीसाठी समिती, सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
Nashik Crime : नाशिक (Nashik) प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी समिती नेमून 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील मुलींच्या आधार आश्रमातील (Aadhar Ashram) प्रकरण चांगलेच चर्चेत असून या प्रकरणासंदर्भात राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता केंद्रस्तरावर देखील या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमून 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिकच्या म्हसरुळ परिसरातील ज्ञानपीठ आधार आश्रमात तीन दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी आश्रम संचालक हर्षल मोरेला (Harshal More) अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आश्रमातील विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले असता पाच विद्यार्थिनींवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर हर्षल मोरेवर म्हसरुळ पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर आता हे प्रकरण थेट केंद्र शासनांपर्यत गेले असून आदिवासी मुलींना न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय यासाठी समिती नेमण्यात येऊन पुढील सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याबाबतीत महिला व बालविकास विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अन्य पाच मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड
दरम्यान पोलिसांनी आधाराश्रमातील अन्य 15 मुलींचाही जबाब नोंदवला. चार मुलींच्या जबाबातून त्यांच्यावरही लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. पिडीत सहा मुलींपैकी पाच मुली अल्पवयीन असल्याचे समजते. यातील एका मुलीवर एका मुलीवर ग्रामीण भागात तर पाच मुलींवर आश्रमातच अत्याचार करण्यात आले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान पिडित पाचही मुलींची वैद्यकिय तपासणीही करण्यात आली असून त्यांचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्याचे समजते. दरम्यान घटनेवरून नाशिक शहरातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून खऱ्या अर्थाने शहरातील आश्रमांचे ऑडिट करण्याची वेळ आल्याचे दिसते आहे.