Chhagan Bhujbal : ‘हरी तुला आम्ही मरू देणार नाही, तू सुरु केलेलं....' श्रद्धांजली सभेत मंत्री छगन भुजबळांच्या अश्रूंचा बांध फुटला!
Chhagan Bhujbal : ‘हरी तुला आम्ही तुला मरू देणार नाही, तू सुरु केलेलं काम आम्ही नेटाने पुढे नेऊ’ अशा शोकसंवेदना भुजबळांनी व्यक्त केल्या.
मुंबई : ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा.हरी नरके (Hari Narke) यांच्या निधनाने माझा वैचारिक आधारस्तंभ हरपला असल्याच्या शोकभावना व्यक्त करतांना मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना अश्रू अनावर झाले. यावेळी ‘हरी तुला आम्ही तुला मरू देणार नाही, तू सुरु केलेलं काम आम्ही नेटाने पुढे नेऊ’ अशा शोकसंवेदना त्यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांचे दि. 9 ऑगस्ट 2023 रोजी दुःखद निधन (Hari Narke Death) झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुंबई येथील भुजबळ नॉलेज सिटीत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस (Mourning Meeting) सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, कला आदी क्षेत्र यांसह सर्वपक्षीय राजकीय मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. प्रा.हरी नरके हे लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि ओबीसी चळवळीचे खंदे कार्यकर्ते होते. तब्बल 55 पेक्षा अधिक पुस्तके आणि शोधनिबंध लिहिले. देशासह जगभरातील 60 हून विद्यापाठातील चर्चामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले होते. त्यांचे विविध वर्तमानपत्र, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून 100 पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले होते.
ते पुढे म्हणाले की, फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारासाठी कोणाशीही भांडायला तयार होते. आपला विचार नव्या पिढी पर्यंत पोहचवायचा असेल तर नव्या पिढीची जी माध्यमे आहेत त्या मार्गाने आपण सुद्धा जायला हवे असा विचार करणारे ते होते असे त्यांनी सांगितले. एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले नरके यांनी पुण्यात येऊन अगदी स्मशानभूमीत देखील काम केले. पुण्यातील नामांकित अशा टेल्को कंपनीची नोकरी महात्मा फुले यांच्या विचारासाठी त्यांनी सोडली. पुणे विद्यापीठात (Pune University) प्राध्यापक म्हणून काम केलं. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते. तसेच पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष पद त्यांनी भूषविल. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, प्रबोधनाच्या चळवळीत काम करायचे असेल तर सुरवात स्वतः पासून करावी लागते म्हणूनच हरी नरके यांनी आंतरजातीय विवाह केला. विवाहमध्ये स्वतः पु.ल देशपांडे यांनी मदत केली होती, या आठवणीना त्यांनी उजाळा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घरात लावला म्हणून लहान असताना ज्या हरी नरके यांना त्यांच्या मामांनी मारले होते. त्याच हरी नरके यांनी नामांतराच्या लढयात उडी घेतली आणि 22 दिवस ठाणे कारागृहात कारावास भोगला. आजही या मनुवादीवृत्ती फोफावत चालल्या आहेत असे दिसले तेव्हा प्रा. हरी नरके, उत्तम कांबळे आणि रावसाहेब कसबे हे बाहेर पडले आणि महाराष्ट्र पिंजून काढत तब्बल 25 पेक्षा अधिक सभा घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रा.हरी नरके हे आयुष्यभर फुले, शाहू, आंबेडकर यांचे जीवन जगले. ते आम्हा सर्वांना पुरोगामी चवळीतला एक तेज:पुंज हिरा म्हणून स्मरणात राहतील अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी प्रा.हरी नरके यांच्या पत्नी संगीता, मुलगी प्रमिती व नरके कुटुंबीय, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह संपूर्ण भुजबळ कुटुंबीय, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
समता परिषदेकडून 5 लाख रुपये शिष्यवृत्ती
यावेळी प्रा.हरी नरके यांची सर्व ग्रंथ संपदा सुमारे 25 हजारांहून अधिक संपदा एकत्र करून मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे प्रा.हरी नरके यांच्या नावाने ग्रंथालय स्थापन करण्यात येईल. दरवर्षी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या इतिहास संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, शोध पत्रकारिता, गरीब विद्यार्थी, फुले, शाहू व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करणाऱ्या समाज सुधारक आणि मागासवर्गीयांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ता यांच्यासाठी एकत्रितपणे हरी नरके यांच्या नावाने 5 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी याप्रसंगी केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :