Nashik News : आफ्रिकेहून पसंती, घोटीच्या तांदूळ व्यापाऱ्याला चंदन, 38 लाखांची फसवणूक
Nashik Crime : घोटी येथील तांदूळ व्यापाऱ्याची 38 लाखाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
Nashik Crime : शेतकऱ्यांसह सद्यस्थितीत व्यापाऱ्यांची देखील फसवणूक (Fraud) होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. घोटी (Ghoti) येथील प्रसिद्ध तांदूळ (Rice) व्यापाऱ्यास नफ्याचे आमिष दाखवून बोरिवली येथील दोघांनी 38 लाखाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविण्यात आली आहे.
नाशिक (Nashik) जिल्हा द्राक्ष उत्पादनाबरोबर तांदूळ उत्पादनात देखील अग्रेसर आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), इगतपुरी, सुरगाणा पेठ आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तांदळाचे उत्पादन घेतले जाते. ज्या पद्धतीने द्राक्ष हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडतात. असाच काहीसा प्रकार घोटी येथील व्यापारी लक्ष्मण काळे यांच्यासोबत घडला आहे. परदेशात धान्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे तांदूळ, मैदा आदी साहित्य निर्यात केल्यास नफा होईल, असे आमिष दाखवून 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. लक्ष्मण काळे यांनी घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) तक्रार केली आहे.
काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बोरिवली (Mumbai) येथील रहिवासी जयेश भरत बर्मन व भरत बर्मन यांनी काळे यांना, दक्षिण आफ्रिकेत व परदेशात तांदळाचे भाव वाढले आहेत. तुम्ही निर्यात केली तर चांगली किंमत मिळू शकेल. तुमचा तांदूळ निर्यात करण्यासाठी आम्ही मदत करू, असे वेळोवेळी सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर निर्यातीचा परवाना काढण्यासाठी 12 ते 15 लाख रुपये लागतात. तो आम्ही 10 लाखांत मिळवून देतो, असे सांगून जयेश बर्मन यांनी काळे यांना संत तुकाराम साखर कारखाना येथे नेऊन तीन लाख 11 हजार रुपये डीडीद्वारे भरून घेतले.
यापाठोपाठ आफ्रिकेमध्ये आटा व मैदा यांचेही भाव वाढले आहेत, अशी बतावणी संशयितांनी केल्यामुळे काळे यांनी नाशिक रोडच्या मोठ्या व्यापाऱ्याकडून चार लाख 23 हजार 750 रुपये किमतीचा आटा व मैदा खरेदी केला. मात्र, यानंतर संशयितांनी या मैद्याची निर्यात केलीच नाही. त्यामुळे या किमतीचा भुर्दंड काळे यांना सहन करावा लागला. तसेच, तांदूळ निर्यातीसाठी काळे यांनी संशयितांना 25 किलो वजनाची एक बॅग असा 119 टन वजनाचा तांदूळ पॅकिंग करून न्हावाशेवा बंदरात पाठवून दिला.
दरम्यान या तांदळाचा वाहतूक खर्च म्हणून सात लाख 50 हजार रुपये दिले. त्यानंतर संशयितांनी आपण स्वतःच व्यापारी काळे असल्याचे भासवून काळे यांचा तांदूळ स्वतःच्या नावाने निर्यात करून आलेल्या रकमेचा अपहार केला. यासह विविध कारणांनी वेळोवेळी रोख व इतर माध्यमांतून संशयितांनी काळे यांची एकूण 38 लाख 37 हजार 497 रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित भरत बर्मन व जयेश बर्मन यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.