Nashik News : धक्कादायक! नाशिकमध्ये मानसिक रुग्णाचे हातपाय बांधून अघोरी पूजेचा प्रयत्न, ग्रामस्थांची सजगता
Nashik News : देश एकीकडे डिजिटल इंडिया हि संकल्पना राबवत असताना निफाड तालुक्यात एका मानसिक रुग्णाचे हातपाय दोरीने बांधून अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Nashik News : देश एकीकडे डिजिटल इंडिया हि संकल्पना राबवत असताना दुसरीकडे मात्र अजूनही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड तालुक्यात (Niphad) असाच एक अंधश्रद्धेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. देवळा तालुक्यातील चिंचवे येथील एका मानसिक रुग्णाचे हातपाय दोरीने बांधून अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
देवळा तालुक्यातील चिंचवे येथील मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या तरुणाच्या बाबतीत हि घटना घडली आहे. हा तरुण गेल्या काही दिवसापासून मानसिक आजारात आहे. मात्र तरुणांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांकडे न जाता अनेक देवस्थानांना नेले. यांनतर त्याच्या पायात लोखंडी बेडी टाकून त्याला बांधण्यातही आले. शेवटी नातेवाइकानी त्यास परिसरातील शिरवाडे (वाकद) येथील एका बाबाकडे नेले. यावेळी बाबाने तरुण बारा होण्यासाठी अघोरी पूजा करावी लागेल, असा अजब सल्ला दिला. यासाठी गोदावरी नदीत आंघोळ घालून अघोरी पूजा करण्यात येणार होती. मात्र काही सुज्ञ नागरिक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या सतर्कतेने या प्रकाराला आळा घालण्यात यश मिळाले.
सदर अघोरी पूजेसाठी मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास नातेवाईक व भगत मोरवीस या गावी आले. या गावाजवळ गोदावरी नदीचे पात्र असून नदीकाठी रहदारीपासून दूर अंतरावर एकांतात जमा झाले. मात्र ही गोष्ट काही स्थानिक गावकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांना ही बाब संशयास्पद वाटल्याने ते तिथे गेले असता हा अघोरी प्रकार समोर आला. यावेळी मोरवीस गावचे पोलीस पाटील सोमनाथ पारखे व गावकरी गोरख कोकाटे यांनी तत्काळ हा प्रकार उधळून लावत घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिक येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना दिली.
दरम्यान चांदगुडे यांनी तात्काळ घटनेची दखल घेत तरुणास मानसिक आजार असल्याने त्यास अशा अघोरी पुजेपेक्षा डॉक्टरांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर गावकर्यांनी पिडीतास बांधलेल्या दोरातुन मुक्त पोलीसांना घटनेची माहिती दिली. तसेच संबधित बाबावर कारवाईची मागणी केली. गावकर्यांच्या जागरुकतेमुळे अघोरी प्रयत्न थांबला असल्याने त्यांचे परीसरात कौतुक होत आहे.
मुलगा आठवी इयत्तेत
सदर मानसिक रुग्ण असलेला हा मुलगा आठव्या इयत्तेत शिकत असून मूळचा देवळा तालुक्यातील चिंचवे येथील राहणार आहे. मुलाला मोकळं सोडून जमत नाही, अन्यथा हाताशी येईल ते उचलून फेकतो, म्हणून त्याला बांधून ठेवावे लागते, अशी प्रतिक्रिया मुलाच्या वडिलांनी दिली.
मानवी शरीर अनेकदा आजारी पडते, त्याचप्रमाणे मन देखील आजारी पडू शकते. त्यामुळे मानसिक आजराने त्रस्त असलेल्या रुग्णास साखळदंडात बांधून न ठेवता किंवा कुना बाबा बुवांकडे न नेता त्यास मानसोपचार तज्ञाची गरज असते. अशा घटनांत अंनिसकडून समुपदेशन केले जाते. त्यामुळे अशा रुग्णाच्या नातेवाईकांनी अंनिसशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.