Nashik Graduate Constituency: नाशिक पदवीधरच्या मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूम सील; पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
MLC Elections : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी सय्यद पिंपरी येथील स्ट्रॉंग रूम सज्ज झाली असून पाच जिल्ह्यातून मतपेट्याही पोहोचल्या आहेत.
Nashik Graduate Constituency : नाशिक (Nashik News) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 49.28 टक्के मतदान झाले असून 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. नाशिक विभागाच्या पाचही जिल्ह्यातून मतपेट्या पहाटेपर्यंत नाशिक तालुक्यातील सय्यद पिंपरी स्ट्रॉंग रूमला पोहोचल्या असून सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्ट्रॉंग रूम सील करण्यात आली.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी (Nashik Graduate Constituency) काल शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत अवघे 49.28 टक्के झाले असून 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. विभागातील पाचही जिल्ह्यातून आज पहाटेपर्यंत मतपेट्या नाशिक तालुक्यातील सय्यद पिंपरी गावच्या स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचताच सकाळी साडेसात वाजता स्ट्रॉंग रूम सील केली गेली. दोन फेब्रुवारीला मतमोजणीच्या दिवशीच ही स्ट्रॉंग रूम आता उघडली जाईल. स्ट्रॉंग रूम सील होताच या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे रूप आले असून सीसीटीव्ही कॅमेराचीही यावर नजर असणार आहे. स्थानिक पोलीस, SRPF चे दोन प्लॅटून्स, होमगार्ड्स आणि बंदूकधारी पोलीस इथे 24 तास तैनात असतील.
दरम्यान, सकाळी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सर्व सुरक्षेचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. स्ट्रॉंग रूमबाहेरील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेत पोलीस अधीक्षकांनी काटेकोरपणे पाहणी केली आहे. यावेळी निवडणूक निरीक्षक, विभागीय आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मागील पंचवार्षिकला पदवीधर निवडणुकीसाठी 54.38 टक्के मतदान पार पडले होते. मात्र त्या तुलनेत यंदा 5 टक्के कमी मतदान झाले असून प्रशासनाने सर्व तयारी केली होती. पण जनजागृती आणखी करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
असं झालं मतदान
विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 69 हजार 652 मतदारापैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदारापैंकी 58 हजार 283 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान झाले आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 23 हजार 412 मतदारापैंकी 11 हजार 822 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 50.50 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 35 हजार 58 मतदारापैंकी 18 हजार 33 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 51.44 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण 18 हजार 918 मतदारापैंकी 9 हजार 385 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 49.61 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.