सत्यजीत तांबे अन् शुभांगी पाटील यांचं भवितव्य मतदानपेटीत बंद, नाशिक पदवीधरसाठी 49.28 टक्के मतदान
Nashik Graduate Constituency : सत्यजीत तांबे अन् शुभांगी पाटील यांच्यासह 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे.
Nashik Graduate Constituency : राज्यातील पाच शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अवघे 49 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूणच पदवीधर मतदारांनी नाशिक निवडणूक मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. आज झालेल्या मतदानानंतर 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांचं भवितव्य मतदानपेटीत बंद झाले आहे. दोन फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघात कोण बाजी मारणार? हे स्पष्ट होणार आहे.
पहिल्या दिवसांपासून चर्चेत असलेली नाशिक पदवीधर निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज सुरळीतपणे पार पडली. ज्या पद्धतीने गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून निवडणुकीचा ज्वर दिसून येत होता, त्या मानाने मतदारांनी तितकासा प्रतिसाद निवडणूक मतदानाला दिला नसल्याचे आजच्या निवडणूक मतदान आकडेवारी वरून स्पष्ट झाले. जवळपास अडीच लाखांहून अधिक मतदार असतांना अवघ्या 01 लाख 30 हजार मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला. त्यामुळे आता 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून दोन प्रबळ उमेदवार असलेल्या उमेदवारांचा कस लागणार आहे.
नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले असून 49.28 टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे यांनी दिली.
विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 69 हजार 652 मतदारापैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदारापैंकी 58 हजार 283 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान झाले आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 23 हजार 412 मतदारापैंकी 11 हजार 822 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 50.50 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 35 हजार 58 मतदारापैंकी 18 हजार 33 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 51.44 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण 18 हजार 918 मतदारापैंकी 9 हजार 385 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 49.61 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.