(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Rain : नाशिकमध्ये पावसाचा कहर, सहा तासांत तब्बल 86.9 मिलीमीटर पावसाची नोंद
Nashik Rain : नाशिक (Nashik) शहरासह परिसरात काल रात्रीपर्यंत 86.9 मिलीमीटर पावसाची नोंद (Heavy Rain) करण्यात आली आहे.
Nashik Rain : नाशिक (Nashik) शहरासह परिसरात अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) पूर्वसंध्येला पावसाने तुफान बॅटिंग (Heavy Rain) केली असून सायंकाळी पावणे सहा वाजेपासून सुरु झालेला पाऊस रात्री पावणे बारा वाजेपर्यत कोसळत होता. जवळपास पावणे सहा ते रात्री साडे अकरा पर्यंत 86.9 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी होते, तर उड्डाणपूलही पाण्याचे वाहत होते.
दरम्यान हवामान खात्याने नाशिकला गुरुवारपासूनच पावसाचा इशारा दिला होता. तत्पूर्वी बुधवारी देखील पावसाने हजारी लावल्याचे पाहायला मिळाले. तर आज देखील सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तर आता लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. शहरात सगळीकडे लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान हवामान खात्याकडून नाशिकला गुरुवारपासून शनिवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरुवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत धुमाकूळ घातल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीच पाणी झाल्याचे चित्र होते. मध्यवर्ती भागांसह उपनगरातही रस्ते तसेच सखल भागांत पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले, तर अनेक ठिकाणी वृक्ष तसेच भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. सायंकाळी पावणे सहा ते रात्री साडेआठ या तीन तासात 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर त्यानंतरही रात्री साडे आकरा वाजेपर्यत पाऊस बरसत होता. यावेळी 86.6 इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गंगापूर धरणातून 1000 क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीची पातळी वाढली. रात्री उशिरापर्यंत तोंडात मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आल्याचे दिसून आले.
विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच मुसळधार पाऊस कोसळल्याने गणेश मंडळांसोबतच भाविकांच्या उत्साहावरही पाणी फेरल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडात पाऊस झाल्याने मेन रोड तसेच अन्यत्र गुडघाभर पाण्यातून वाट काढतच नागरिकांनी मार्गक्रमण केले. सायंकाळी सहा वाजता सहा वाजेपासून सुरू झालेला पावसाने रात्री साडेअकरा पावणे बारापर्यंत जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले उड्डाण पूल, रस्ते आदि ठिकाणांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सुमारे दोन दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. द्वारका ते नाशिक रोड भागातील वाहनांच्या रांग लागल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. सातपूर कॉलनी, सराफ बाजार, फुल बाजार परिसरात ड्रेनेजमधील पाणी रस्त्यावरून उतरून रस्त्यात्मुयावर तलाव झाल्याने मोटर सायकल धारकांनाही कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागली.
गणेश मंडळासह भाविकांची धावपळ
एकीकडे उद्या अनंत चतुर्दशी असल्याने आज नाशिक शहरातील देखावे पाहण्यासाठी भाविक उत्सुक होते. मात्र सायंकाळी आलेल्या पावसांनंतर गणेश मंडळासह भाविकांची चांगलीच पळापळ झाली. संध्याकाळी सार्वजनिक मंडळाच्या देखावे खुले करण्याचे काम सुरु होते. मात्र आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांसह गणेश मंडळांचा हिरमोड झाला. देखाव्यांचा हा अखेरचा दिवस असल्याने अनेकांनी गुरुवारी देखावे पाहण्याचे नियोजन केले होते. अखेरच्या दिवशी देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते, मात्र पावसाने गणेश भक्तांना घरातच बसण्यास भाग पाडल्याने उत्साहावर पाणी फेरले. बाहेर पडणे शक्य नसल्याने नागरिकांनी भारत अफगाणिस्तान मॅच पाहण्यास पसंती दिली. मात्र अनेक ठिकाणी विजेंचा लपंडाव सुरू असल्याने ही नागरिकांचा हीरमोड झाला.