Akole Nilwande Dam : 53 वर्षांचं काम, 5700 कोटी रूपयांचा खर्च, निळवंडे धरणांमुळे अहमदनगरसह सिन्नरला पाणी
Akole Nilwande Dam : बहुप्रतीक्षित निळवंडे धरणावर आतापर्यंत 5700 कोटींचा खर्च झाला असून तब्बल 53 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वास गेले आहे.
Akole Nilwande Dam : बहुप्रतीक्षित निळवंडे धरण (Nilwande Dam) प्रकल्प तब्ब्ल 53 वर्षांनंतर पूर्णत्वास गेला असून कालव्यांची कामे सुद्धा पूर्ण झाल्याने अकोलेसह, सिन्नरच्या काही भागातील गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. आतापर्यंत एकूण 5700 कोटींचा खर्च आणि 53 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज इथल्या नागरिकांना निळवंडे धरणाची उत्सुकता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे EKnath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांच्या हस्ते 31 मे रोजी कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी केली जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर निळवंडे धरण प्रकल्प साकार झाला आहे. या धरण प्रकल्पासाठी एप्रिल 2023 अखेर 5700 कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. या धरणामुळे अहमदनगरच्या सहा दुष्काळ भागातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल. अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी हे धरण महत्वपूर्ण ठरणार आहे.
साधारण 1970 च्या सुमारास या प्रकल्पाला मान्यता मिळाली. मात्र सुरवातीच्या दोन गावांनी विरोध दर्शविल्याने हा प्रकल्प बारगळत राहिला. शेवटी 1993 मध्ये निळवंडे परिसरात धरण प्रकल्प कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली. त्यानुसार निळवंडे प्रकल्पावर डावा कालवा, उजवा कालवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजना असे चार कालवे आहेत. डावा कालवा हा 85 किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेमधील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि सिन्नर मधील सहा गावे असे एकूण 113 गावांमधील पाणी प्रश्न मिटणार आहे. तर उजवा कालवा हा 97 किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील 69 गावांमधील 20395 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रोजी कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी केली जाणार आहे. उत्तर अहमदनगर जिल्हयातील 182 गावांना वरदान ठरणा-या निळवंडे धरणाच्या कालव्यांना आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यास सुरूवात होणार आहे. निळवंडे कॅनॉलच्या पाण्याने साई समाधीला जलाभिषेक करणार असुन 182 गावातील शंकराच्या मंदिरात देखील तेथील शेतकरी जलाभिषेक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.