Nashik News : धक्कादायक! नाशिकमध्ये विक्री केला जातोय भेसळयुक्त गूळ? एफडीएकडून तीन हजार ०६ किलो गूळ जप्त
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) अन्न औषध प्रशासनाने (food drug administration) याबाबत भलीमोठी कारवाई केली असून यामध्ये तीन हजार 06 किलो गूळही जप्त करण्यात आला आहे.
Nashik News : अनेक घराघरांत गूळ वापरला जातो. अलीकडे तर गुळाच्या चहा देखील फेमस झाला आहे. मात्र सावधान तुम्ही खात असलेला गूळ भेसळयुक्त तर नाही ना? कारण नाशिकमध्ये अन्न औषध प्रशासनाने याबाबत भलीमोठी कारवाई केली आहे. यामध्ये तीन हजार 06 किलो गूळही जप्त करण्यात आला आहे.
नाशिक शहरात गेल्या काही वर्षांत गुळाची मागणी वाढत आहे. त्यात गुळाच्या अर्धा-एक किलोच्या ढेपांपासून ते पावडरच्या गुळापर्यंतचा समावेश आहे. दरम्यान शहरातील रविवार पेठ येथील बाजारपेठेत होलसेल गुळाची विक्री करणाऱ्या एका दुकानातील भेसळीच्या संशयावरून अन्न औषध प्रशासन विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईत तब्बल 2 लाख 40 हजार 480 रुपये किमतीचा 3 हजार 06 किलो गूळ जप्त केला. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
एकीकडे कोरोना काळात गुळाला मोठी मागणी वाढल्याचे दिसून आले. यामध्ये गुळाचा काढयासह चहा व इतर पदार्थांत गुळाचा वापर वाढू लागला आहे. परिणामी बाजारपेठेतही गुळाला जास्त मागणी आहे. त्यामुळे गुळाचे विविध प्रकारही बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये गुळाची भेली, गुळाची ढेप आदी प्रकार किरकोळ विक्रेते, होलसेल व्यापाऱ्यांकडे विक्रीला असतात. त्याचबरोबर गुळाची विक्री करण्यासाठी शहरात येणाऱ्या महामार्गांवर ठिकठिकाणी चारचाकी वाहनातून गुळाची विक्री होत असल्याचे आपल्या नजरेस पडते.
दरम्यान नाशिकच्या अन्न औषध प्रशासन विभागाला गुळामध्ये रंग टाकून भेसळ केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, अविनाश दाभाडे, योगेश देशमुख यांच्या पथकाने रविवार पेठेतील एका कंपनीवर छापा टाकून गुळ जप्त केला आहे. जप्त केलेला गुळ सबंधित कंपनीतच सील करण्यात आला असून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी रासकर यांनी दिली. नाशिक विभागाचे सह आयुक्त चंद्रशेखर साळुंके, सहायक आयुक्त गणेश परळीकर व विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हॉटेल व्यावसायिकास नोटीस
शहरातील अनेक हॉटेलमध्ये व्यवस्थित स्वच्छता केली जात नसल्याने अन्न पदार्थांमध्ये झुरळ निघत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी कॉलेजरोडवरील एका हॉटेलची तपासणी केली असता हॉटेलच्या स्वयंपाक घरात अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे सबंधित व्यावसायिकास सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील सर्वच हॉटेलची अचानक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली.