(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Bharati Pawar : नाशिक जिल्ह्यात नाफेडकडून कांदा खरेदी सुरु, दोन दिवसात 3 हजार क्विंटल कांद्याची खरेदी
Bharati Pawar : शेतकऱ्यांच्या कांद्याला नाफेडच्या माध्यमातून उचल मिळत असल्याची माहिती राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.
Bharati Pawar : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील विविध तालुक्यातून कांदा खरेदी (Onion Issue) सुरु असून शेतकऱ्यांच्या कांद्याला नाफेडच्या माध्यमातून उचल मिळत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. कांदा निर्यात बंद नव्हती, तर निर्यात सुरू आहे. पण विरोधकांकडून अप्रचार सुरू असल्याची टीका भारती पवार (Bharati Pawar) यांनी यावेळी केली.
एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न पेटला असून राज्यभरात शेतकऱ्याकडून आंदोलन (Farmers Protest) करण्यात आले. याची दखल आज विधिमंडळाच्या सभागृहात देखील घेण्यात आली. यावेळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर कांद्याला हमीभाव देण्याबाबत आंदोलन केले. शिवाय सभागृहात देखील कांदा हमीभावाचा विषय मांडण्यात आला. अशातच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागात नाफेडच्या (NAFED) माध्यमातून कांदा खरेदी सुरु करण्यात आली असून मागील दोन दिवसांत 3 क्विंटल कांदा खरेदी झाल्याचे त्या म्हणाल्या.
नाशिकमध्ये कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून काल शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनात पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मध्यस्थी केली. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने लासलगाव (Lasalgaon) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानंतर दुसरीकडे जिल्ह्यातून नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरु झाल्याचे पवार यांनी म्हटले आहे. यावेळी मंत्री भारती पवार म्हणाल्या कि, कांद्याचे पडलेले भाव सावरण्यासाठी नाफेड कडून कांदा खरेदी करण्यात येत आहे. दोन दिवसात 3 हजार क्विंटल कांद्याची खरेदी करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातून कांदा खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला नाफेडच्या माध्यमातून उचल मिळते आहे. कांदा निर्यात बंद नव्हती निर्यात सुरू असून विरोधकांकडून अप्रचार सुरू आहे. ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी निर्यात करावी. शेजारील राष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम झाला होता. यापुढेही कांदा निर्यात आणि नाफेडकडून कांदा खरेदी सुरू राहील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.
साडेचारशे रुपयापासून बाजार खुले
सोमवारी झालेल्या आंदोलनानंतर आजपासून पूर्ववत लिलाव प्रक्रिया सुरु झाली असून सुरुवातीच्या लिलावात साडेचारशे रुपयापासून बाजार खुले झाले. कमीतकमी कमी हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनानंतर परिस्थिती जैसे थे आहे. दुसरीकडे सभागृहात विरोधकांनी कांद्याला हमीभाव देण्याबाबत मागणीला जोर लावला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाफेडने कांदा खरेदी सुरु केली असल्याचे ते म्हणाले. ज्या भागात अद्याप कांदा खरेदी सुरु झाली नाही, त्या ठिकाणी लवकरात लवकर कांदा खरेदी सुरु होईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.