Maharashtra Assembly Elections 2024 : चांदवडमधील भाजप उमेदवारीचा चेंडू देवाभाऊंच्या कोर्टात, राहुल आहेर की केदा आहेर? फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष
Chandwad-Deola Assembly Constituency : डॉ. राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) रविवारी जाहीर केली. या यादीत निवडणुकीत माघार घेतलेले चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे (Chandwad Deola Assembly Constituency) विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) यांचे नाव आल्याने चांदवडमध्ये चर्चांना उधाण आले. आता चांदवड मतदारसंघाच्या उमेदवारीचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कोर्टात पोहोचला आहे.
चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक डॉ. राहुल आहेर हे भाजपचे आमदार आहे. भाजपच्या (BJP) तिकिटासाठी विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) व नाफेडचे संचालक केदा आहेर (Keda Aher) या दोघात भावात जोरदार रस्सीखेच दिसून आली. तीन दिवसांपूर्वी आमदार राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. तसेच केदा आहेर (Keda Aher) यांना चांदवड-देवळा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. वरिष्ठांकडूनही या निर्णयाला संमती दिल्याचे देखील डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले होते.
देवेंद्र फडणवीस नेमका काय निर्णय घेणार?
त्यातच काल भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपच्या पहिल्या यादीत डॉ.राहुल आहेर यांचे नाव घोषित झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यानंतर डॉ. राहुल आहेर व केदा आहेर यांनी देवळ्यात मेळावा घेतला. आमदार डॉ. राहुल आहेर व इच्छुक केदा आहेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता चांदवडच्या उमेदवारीचा निर्णय होणार देवेंद फडणवीस यांच्या कोर्टात गेल्याचे दिसून येत आहे. आता देवेंद्र फडणवीस नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
...अन् 'नाराज' मेळाव्यात 'खुशी'
दरम्यान, आमदार राहुल आहेर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे त्यांचे चुलत बंधू केदा आहेर यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. या नाराजीनंतर रविवारी चांदवड येथे समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मेळावा सुरु होण्याअगोदर भाजप उमेदवारांच्या जाहीर झालेल्या यादीत विद्यमान आमदार राहुल आहेर यांचे नाव आल्याने समर्थकांनी नाराजीचा सूर बदलत खुशीचा सूर आवळला. पक्ष नेत्यांचे आभार मानत आमदार राहुल आहेर यांचे गुणगान या मेळाव्यात गायले गेले. तर दुसरीकडे केदा आहेर हे मेळाव्यात बोलताना भावूक झाल्याचे दिसून आले.
आणखी वाचा