(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
Hemant Godse : नाशिक जिल्ह्यातील पाच ते सात विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकला आहे. तर दोन टर्म खासदार राहिलेले हेमंत गोडसेंचे राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे. तर काही जागांवर दावेदारी देखील सुरु आहे. आता नाशिक जिल्ह्यातील पाच ते सात विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना शिंदे गटाने (Shiv Sena Shinde Group) दावा ठोकला आहे. तर आता दोन टर्म खासदार राहिलेले हेमंत गोडसेंचे पुनर्वसन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी नाशिक दौरा केला होता. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते हे आमच्या सोबत विधानसभेत दिसतील, असे वक्तव्य करत एक प्रकारे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर दावाच ठोकला होता. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच जागांवर तयारी असल्याचा इशाराच भाजपने शिवसेनेला दिला होता. यामुळे नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात होते.
पाच ते सात विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा
आता नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील पाच ते सात विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा आहे. त्यानुसार उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. महायुतीला बहुमतात आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते कामाला लागले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
हेमंत गोडसेचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. शिवाय महामंडळांवर नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे आणखी एक महामंडळ जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोदावरी खोरे विकास महामंडळावर माजी खासदार गोडसे यांची वर्णी लागणार का? अशी चर्चा आता रंगली आहे. कारण हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना सामावून घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा विश्वास आहे. लवकरच माझे राजकीय पुनर्वसन होणार आहे. गोदावरी खोरे विकास महामंडळावर मला काम करायला आवडेल. गोदावरी खोरे संदर्भातील अनेक कामे पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. मी स्वतः इंजिनिअर असल्यामुळे त्यातील मला माहिती देखील आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसेंचे राजकीय पुनर्वसन होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा