(Source: Poll of Polls)
Har Ghar Tiranga : हर घर में तिरंगा.. हर मनं में तिरंगा! नाशिक विभागातील 38 लाख 51 हजार घरांवर फडकणार तिरंगा
Har Ghar Tiranga : भारतीय स्वातंत्र्याच्या (Independence Day) महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात (Nashik Division) ‘हर घर झेंडा’ (Har Ghar Tiranga) उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Har Ghar Tiranga : भारतीय स्वातंत्र्याला (Independance Day) 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात (Nashik Division) 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ (Har Ghar Tiranga) उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाशिक विभागातील शहरी व ग्रामीण भागातील घरांची एकूण संख्या 38 लाख 51 हजार 651 इतकी असून या प्रत्येक घरांवर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्यात येऊन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित यंत्रणांना केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने नागरिकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृति तैवत रहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
नाशिक विभागातील नागरी भागात एकूण 10 लाख 62 हजार 578 घरे आहेत. नाशिक विभागातील ग्रामीण भागात एकूण 27 लाख 89 हजार 73 घरे आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने पाचही जिल्ह्यांना एकूण 7 लाख 66 हजार 369 झेंडे पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात 12 लाख 05 हजार 288 घरांवर, अहमदनगर जिल्ह्यात 08 लाख 99 हजार 666 घरांवर, जळगाव जिल्ह्यात 9 लाख 65 हजार 391 घरांवर, धुळे जिल्ह्यात 4 लाख 02 हजार 119 घरांवर, नंदूरबार जिल्ह्यात 3 लाख 79 हजार 187 घरांवर तिरंगा फडकणार आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्राधिकृत सनियंत्रण प्रणाली
‘हर घर तिरंगा’ अभियानाबाबतची प्राधिकृत सनियंत्रण प्रणाली (SOP) तयार करण्यात आलेली असून त्यानुसार झेंड्यांचे वितरण सुरळीतपणे करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. डोनेशन पध्दतीने देखील मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरावर झेंडे उपलब्ध करून घेणेबाबतची मोहिम राबविली जात आहे.
24 तास फडकणार तिरंगा
भारतीय ध्वजसंहितेमध्ये 30 डिसेंबर, 2021 च्या आदेशान्वये काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पॉलीस्टर व यंत्राव्दारे तयार करण्यात आलेले झेंडे लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सदर अभियानामध्ये झेंडा फडकविल्यानंतर तो दिवस व रात्र 24 तास फडकविण्यात येणार आहे. हे अभियान 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विभागात यथोचितपणे राबविण्यात येणार आहे. कापड मिल, महिला बचत गट व स्थानिक विक्रेते यांच्याकडून जिल्हास्तरावर ध्वज उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. IEC च्या माध्यमातून सदर अभियान राबविण्याबाबतची जनजागृती करण्यात येत आहे. शाळा व महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामार्फत अभियान यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.