(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil : 'लाडकी बहीण, भाऊनंतर लाडकी बायको योजना आणा'; जयंत पाटलांचा राज्य सरकारला खोचक टोला
Jayant Patil Slams Mahayuti Government : लाडकी बहीण, भाऊ योजना आणल्या आहेत. आता लाडकी बायको योजना आणा, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
नाशिक : आज महाराष्ट्र सरकार हे भेदरलेल्या अवस्थेत आहे. काय करू, कसं करू आणि मतं मिळवू,अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana), भाऊ अशा योजना त्यांनी आणल्या आहेत. आता लाडकी बायको, अशी योजना आणा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारला लगावला आहे. नाशिक येथे आयोजित शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group) निष्ठावंतांच्या मेळाव्यातून ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यातील सर्व जागा निवडून आण्यासाठी प्रयत्न करु. नाशिकने ठरवले तर महाराष्ट्र त्याचे अनुकरण करते. महाराष्ट्र हा भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.सर्व्हे केला तेव्हा राज्यात आघाडीच्या ३५ जागा येतील, असा अंदाज आला पण ३१ जागा आल्या. काही ठिकाणी पैशाचा पाऊस पडला. त्यामुळे काही जागा गेल्या, असे त्यांनी म्हटले.
आता लाडकी बायको योजना आणा
देशात भाजपच्या विरोधात सर्व सामान्य माणसाच्या भूमिका नकारात्मक आहे. आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाटेला काहीही आले नाही. तोंडाला पाने पुसली गेली. ठोस योजना नाही याची खंत आहे. आज महाराष्ट्र सरकार हे भेदरलेल्या अवस्थेत आहे. काय करू, कसं करू आणि मतं मिळवू,अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. आता लाडकी बहीण, भाऊ, अशा योजना आणल्या. आता लाडकी बायको अशी योजना आणा, असा टोला त्यांनी यावेळी सरकारच्या योजनांवर लगावला.
महायुती सरकारकडून राज्याची अधोगती करण्याचे काम
आमचे सरकार आले तरच योजना मिळेल, असे म्हणतात. पण त्यांना सांगतो आम्ही आहे ना खंबीर. हिसका दाखवला म्हणून हे वटणीवर आले. म्हणून या योजना आणताय. शरद पवारांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणताय, पण आमच्यातले सर्व तुम्ही घेतले आहेत. राज्यातील अनेक उद्योग तुम्ही गुजरातला नेलेत. राज्याची अधोगती करण्याचे काम तुम्ही केले, अशी टीका त्यांनी यावेळी राज्य सरकारवर केली.
ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका
जयंत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सूचनाही दिल्या. ते म्हणाले की, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका, चुकीचे विधान होतील असे वागू नका. संयुक्त बैठक होईल तेव्हा कोण कुठे लढणार ते ठरवले जाईल. जो उमेदवार येईल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. आपण उभे राहण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी निवडणूक आहे. निवडणूक लढण्याची अपेक्षा प्रतेकाने व्यक्त करा, पण ज्याची शक्यता आहे त्यालाच आम्ही अभ्यास करून उमेदवारी देऊ. युवक शहर आणि जिल्हा अध्यक्ष यांनी बाहेर पडा. आपल्याकडे २० ऑक्टोबरपर्यंतच वेळ आहे. घाबरलेले सरकार थोडे दिवस मागे पुढे करतील. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेची शपथ घेतली त्या तारखेपर्यंत फार फार तर निवडणूक हे पुढे ढकलू शकता, असे त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा