Nashik News : नाशिक शहरात ईदनिमित्त 'गुलशनाबाद'चे फलक, वादानंतर पालकमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश
Nashik News : नाशिक शहरात ईदनिमित्त होर्डिंग लावण्यात आले आहेत. यातील एका होर्डिंग्जवर गुलशनाबाद असे नाव देण्यात आले होते. यावरुन शहरात मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Nashik News : नाशिक शहरात ईदनिमित्त (Bakri Eid) शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी नाशिक शहराऐवजी गुलशनाबाद नावाचे फलक दिसून आले. यावरुन मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
होर्डिंगबाबत दादा भुसे म्हणाले...
पालकमंत्री दादा भुसे आज नाशिक शहरात दाखल होते. यावेळी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पूर्व नियोजनासाठी बैठक पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान नाशिक शहरात ईदनिमित्त होर्डिंग लावण्यात आले आहेत. यातील एका होर्डिंग्जवर गुलशनाबाद असे नाव देण्यात आले होते. यावरुन शहरात मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर दादा भुसे म्हणाले की, "माझ्याही कानावर ही बाब आली असून पोलिसांशी बोलणार आहे. ही खोडसाळ प्रवृत्ती असून अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ही ते म्हणाले आहेत.
तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात नाशिक शहरात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून बैठक घेण्यात आली. सद्यस्थितीत पावसाला सुरुवात झाली असून मात्र पावसाचा कार्यक्रमावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्यानुसार नियोजन केले जाणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. ते म्हणाले की, "पाऊस सुरु झाला आहे, तरीपण शासन आपल्या दारी हा उपक्रम होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम होत आहे. नाशिकच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी नियोजन बैठक पार पडली आहे. सरकारच्या योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
'मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना'
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू आहेत. यावर भुसे म्हणाले की, "मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आहे. सगळेजण अतिशय पारदर्शक आणि गतीमानपणे काम करत आहेत." चार दिवसांपूर्वी जळगावला कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी लाखों लोकांचा सहभाग असल्याचे ते म्हणाले.
चौकशी सुरु असल्याने ठाकरे गटाकडून मोर्चा : दादा भुसे
तसेच 1 जुलै रोजी ठाकरे गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर दादा म्हणाले की, "ठाकरे गटातील अनेक नेत्यांच्या पाठीमागील काळातील गोष्टी पुढे येत आहेत. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात येत आहे. अनेकांच्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असल्याने मोर्चा काढला जात आहे." तर दुसरीकडे मालेगावात हिंदू संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. यावर ते म्हणाले की, "लोकशाहीत मोर्चा काढणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे." "जेव्हा भूमिका घ्यायची असते, तेव्हा मालेगावचे हिंदू लोक घेतात. त्यामुळे यावेळी त्यांनी मोर्चाची भूमिका घेतली असून ते योग्यरीत्या पार पाडतील," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.