पालकमंत्री दादा भुसेंच्या घरावर आज बिऱ्हाड आंदोलन, असंख्य शेतकरी रस्त्यावर उतरणार, असा असेल आंदोलन मार्ग
नाशिक जिल्हा बँकेच्या (Nashik District Bank) कर्ज वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari sanghatana) आक्रमक झाली आहे.
Nashik News: नाशिक जिल्हा बँकेच्या (Nashik District Bank) कर्ज वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari sanghatana) आक्रमक झाली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या घरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे आहे. मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान नाशिक जिल्हा बँकेच्या वसुली विरोधात हे भव्य बिऱ्हाड मोर्चा काढला जात आहे. या आंदोलनाची रूपरेषा नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना देण्यात आली असून या आंदोलनाची सुरवात कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यांनी केली असली तरी आज सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते गावोगाव या आंदोलनाची जनजागृती करत आहे. उस्फूर्तपणे आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार मोठ्या संख्येने शेतकरी आज आंदोलनात सहभागी होत आहेत. सिन्नर, चांदवड, निफाड, दिंडोरी आदी तालुक्यातील शेतकरी एकवटले असून नाशिक जिल्हा बँकेच्या वसुली संदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांना जाब विचारण्यात येणार आहे.
नाशिक जिल्हा बँकेने 62 हजार शेतकऱ्यांची जमीन लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. घेतलेल्या मुद्दलापेक्षा अनेक पटीने व्याज लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या किमतीपेक्षा कर्ज अधिक झाले आहे. नाशिक जिल्ह्यातले साधारण 65 हजार शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. नाशिक जिल्ह्यात याविरुद्ध मोठा आक्रोश आहे. सरकारनं नाशिक जिल्हा बँकेला राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस करण्याचा आदेश द्यावा. व त्यासाठी योग्य तो हस्तक्षेप करावा. 62 हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात. या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्या मार्फत 16 जानेवारीला लाखो शेतकरी पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत बिऱ्हाड आंदोलन करणार आहे.
अन्यथा आंदोलन तीव्र
आज नाशिक जिल्ह्यातले 62 हजार शेतकरी भूमिहीन होत असताना या शेतकऱ्यांना न्याय मागायचा असेल तर जिल्ह्यातील पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते पालकमंत्री दादा भुसे हेच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात. म्हणून हे आंदोलन आम्ही त्यांच्या घरासमोर करणार आहोत. या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांची आहे. आणि ते ती पार पाडतील. अशी अपेक्षा आम्हाला आहे. अन्यथा हे आंदोलन तीव्र होणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटने चे प्रदेशाध्यक्ष संदिप जगताप यांनी दिला आहे.
असा आहे आंदोलनाचा मार्ग
सकाळी 8.30 वाजता दिंडोरी तालुक्यातील वणी येथील खंडेराव मंदिरापासून पासून दिंडोरी पेठ च्या शेतकऱ्यांचे स्वतःच्या वाहनांनी प्रस्थान होईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता मंगरूळ फाटा, चांदवड टोल नाक्या जवळ निफाड, चांदवड, दिंडोरी, पेठ, सिन्नर या तालुक्यातील शेतकरी एकत्र मालेगाव कडे वाहनांनी प्रस्थान करतील. येथून शेतकरी नेते राजू शेट्टी, अनिल धनवट, ललित बहाळे, संदीप जगताप, अर्जुन तात्या बोराडे हे नेते पदाधिकारी सहभागी होतील. तर दुपारी 12.30 वाजता मनमाड चौफुली, मालेगाव येथे सर्व जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन पालकमंत्री दादा भुसे यांच्या घराकडे प्रस्थान करणार आहेत.
भुसे- राजू शेट्टी यांच्यात बैठक
दरम्यान उद्या होत असलेल्या बिऱ्हाड आंदोलना पूर्वी पालकमंत्री दादा भुसे आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात बैठक होणार असल्याचे समजते. नाशिक जिल्हा बँकेच्या वसुली विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर उद्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मात्र तत्पूर्वीच दादा भुसे आणि राजू शेट्टी यांच्यात बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीवर उद्याच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.