(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Diwali 2022 : नाशिकमध्ये कीर्ती कला मंदिराचा 'नृत्यानुनाद', नृत्याविष्कारांनी रसिक भारावले!
नाशिकच्या रचना ट्रस्ट आणि कीर्ती कला मंदिरच्या वतीने नृत्यानुनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवरचना विद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या आनंदनुपुरांना रसिकांनी प्रचंड उपस्थित दाद दिली आणि चैतन्याने भरलेली ही पहाट उत्तरोत्तर रंगत गेली.
Nashik Diwali 2022 : नक्षीदार सुंदर रांगोळ्या, तेवणाऱ्या पणत्या, फुलांनी सजवलेला परिसर, लखलखता आकाश कंदील आणि सुशोभित रंगमंच अशा मंगलमय प्रसन्न वातावरणात आजपासून दीपोत्सवला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) शहरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर रसिकांना भावणारा नृत्यानुनाद हा दिवाळी पहाटचा सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांना भावला.
आजपासून दिवाळी (Diwali 2022) सणाला सुरुवात झाली असून वसू बारसने (Vasubaras) दिवाळीला प्रारंभ झाला आहे. यामुळे शहरात आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नाशिकच्या रचना ट्रस्ट आणि कीर्ती कला मंदिर (Kirti kala Mandir) यांच्या वतीने नृत्यानुनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवरचना विद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या आनंदनुपुरांना रसिकांनी प्रचंड उपस्थित दाद दिली आणि चैतन्याने भरलेली ही पहाट उत्तरोत्तर रंगत गेली. रवींद्र साठे यांच्या आवाजातील गणेश वंदनेने आदिती पानसे यांनी नृत्यानुनादचा प्रारंभ केला. त्यानंतर त्रितालातील तिहाई तोडे, चक्रदार अशा चढत्या क्रमाने कीर्ती कला मंदिरच्या बालकलाकाराने रंगमंच खुलवला. जुगलबंदीतून केलेली छोट्या मुलींची पडंत भाव खाऊन गेली. आधी, बराबर, दुर्गुण, चौकोन, आठकोन अशा जुगलबंदीतून पेश झालेला कलाकारांना टाळ्यांच्या कडकडे रसिकांनी दाद दिली.
तुलसीदास रचित हनुमान चालीसा आणि श्रीराम वंदने वातावरणात प्रसन्न भक्ती भाव निर्माण झाला नृत्य अर्थात छंद, छंद म्हणजे नाद आणि नाद म्हणजे फक्त आनंद. या आनंदाच्या शिदोरीचा प्रत्येक जपतालाने दिला. नटराज पंडित गोपीकृष्ण यांनी संगीतबद्ध केलेला सोहनी रागातील तराना खूप तयारीने पेश केला. कार्यक्रमाच्या शेवटी पंडित बिरजू महाराज यांनी स्वरबद्ध केलेल्या धमारमधील भैरवी तराण्याने झाला. रेखाताई आणि शर्माताई या गुरुद्वयींकडून मिळालेला नृत्यवारसा अदिती पानसे यांनी पुढील पिढीपुढे ठेवला. पारंपरिक अभिजातेचा डौल सहज सुंदर उत्स्फूर्त लयबद्ध गतीशिलतेचा त्रिवेणी संगम सादर झाला. लहान मोठ्या सर्वच नृत्यंगणांनी चपखल, लयबध्द, पदन्यास देखण्या अभिनयातून रसिकांना खिळवून ठेवले.
दीपोत्सवाचे विविध कार्यक्रम
दिवाळी उत्सवानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सूर विश्वास या अनोख्या मैफिली अंतर्गत शनिवारी पहाट आणि दीपावली मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीचा आनंद स्वरांसोबत द्विगुणित करण्यासाठी विश्वास ग्रुपतर्फे मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायक पंडित डॉक्टर अविराज तायडे, ज्ञानेश्वर कासार, मधुरा बेळे यांचे गायन होणार आहे. त्याशिवाय कला श्री गुरुकुल संस्था इंदिरानगरतर्फे डॉक्टर आशिष राणे रानडे यांची अभंग गायनाचे होणार आहे. तसेच मोदकेश्वर गणेश मंदिरात ही मैफल होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
VIDEO : Nashik Diwali 2022 : नाशिककरांसाठी विद्यार्थ्यांकडून नृत्य सादर, दिवाळी पहाटचं आयोजन : ABP Majha