Dada Bhuse : तू असाच जळत राहा, संजय राऊतांच्या टीकेवर दादा भुसेंचे एका वाक्यात उत्तर
Dada Bhuse Reply To Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत गौरव झाला याचा अभिमान वाटला पाहिजे, पण काही लोकांच्या पोटात कायमचा गोळा आहे असा टोला दादा भुसे यांनी संजय राऊतांना लगावला.

नाशिक : शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नवी दिल्लीत पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्यानंतर त्यावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. खासदार संजय राऊत यांनी तर शरद पवारांवरच टीका केली. त्यानंतर शिंदे गटाकडूनही राऊतांच्या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी राऊतांना एकाच वाक्यात उत्तर दिलं. तू फक्त जळत राहा, एवढच मी बोलेन असं दादा भुसे म्हणाले.
दादा भुसे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अथक कष्ट करत शून्यातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मार्गक्रमण केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने दिल्ली येथे शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या गोष्टीचा महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे. परंतु काही लोकांच्या पोटात कायमचा गोळा आहे. एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व एकत्र असतानाही त्यांच्या पोटात गोळा होता, रोज त्यांची मळमळ बाहेर येते. हे भाकरी खातात मातोश्रीची आणि चाकरी करतात शरद पवारांची. मात्र एकनाथ शिंदे यांचा त्यांनी गौरव केला तरी यांच्या पोटात पुन्हा गोळा उठला. यांच्याबद्दल न बोललेले बरे. तू असाच जळत रहा, एवढेच मी बोलेन."
नवी दिल्लीमध्ये सरहद संस्थेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आल. पण त्यावरुन ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली.
साहित्य संमेलन राजकीय दलाली
नवी दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला आणि इकडे मुंबईत ठाकरेंचा भडका उडाला. शिंदेंचा हा सत्कार ठाकरेंच्या किती जिव्हारी लागला, ते दिवस उजाडताच संजय राऊतांच्या शब्दाशब्दातून दिसून आलं. महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं शिंदेंचा गौरव होणं आणि तेही पवारांच्या हस्ते होणं, या दोन्ही गोष्टी ठाकरेंच्या शिवसेनेला भलत्याच खटकल्या. त्याबद्दलचा ठाकरेंचा संताप राऊतांच्या पत्रकार परिषदेतून बाहेर पडला.
ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली अशा लोकांच्या सन्मानासाठी पवारांनी जायला नको होतं अशा स्पष्ट शब्दात संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली. केवळ टीका करूनच संजय राऊत थांबले नाहीत तर दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनालाच त्यांनी दलालांचं संमेलन ठरवून टाकलं. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कोणाचाही सन्मान केला जातोय हा मराठीचा घोर अपमान असल्याचं राऊत म्हणाले. दिल्लीतला हा सत्काराचा कार्यक्रम केवळ सोहळा न ठरता भूकंप ठरला आणि त्याचे धक्के महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बसायला लागले.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
