Nashik Crime : पायी जाणाऱ्यांना धरायचे अन् त्यांचे मोबाईल पळवायचे! नाशिकमधून चोरलेले 39 मोबाईल मिळाले!
Nashik Crime : गेल्या काही दिवसांत मोटरसायकल, लॅपटॉप, मोबाईल चोरीच्या (Mobile Theft) घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात मोबाईल चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच नाशिक पोलिसांनी नागरिकांच्या हातातून मोबाईल खेचून पळणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून तब्बल पावणे लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत मोटरसायकल, लॅपटॉप, मोबाईल चोरीच्या (Mobile Theft) घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्रासपणे दिवसाढवळ्या नागरिकांची नजर चुकवून चोर अलगदरीत्या अशा चोऱ्या करत असल्याचे पोलिसांचं म्हणणे आहे. त्यामुळे अनेकदा मोबाईल, लॅपटॉप शोधणे अवघड होत आहे. अशातच जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सातपुर पोलीसांनी जेरबंद करून त्याच्याकडून 31 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. सातपुर येथील फिर्यादी फोनवर बोलत पायी जात असतांना त्यांच्या पाठीमागुन मोटार सायकलवरून आलेल्या संशयितांनी मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून पळवून नेला. याबाबत तपास सुरु असताना विकास चंद्रकांत वाघ यास सोमेश्वर कॉलनी येथून ताब्यात घेत अनेक मोबाईल फोन्स ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान विकास वाघ याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याकडून जवळपास 93 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर त्यास अटक केल्यानंतर पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली. यादरम्यान चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून जवळपास 27 मोबाईल हस्तगत करण्यात आले. तत्पूर्वी चार मोबाईल हस्तगत करण्यात आले होते. असे एकूण पावणेचार लाख रुपयांचे 31 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. तर दुसरी घटना 27 जुलै रोजी उघडकीस आली आहे. नाशिकच्या गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडून जवळपास आठ चोरीचे मोबाईल आढळून आले. त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर दोन साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
फोन करण्याच्या बहाण्याने...
नाशिक शहरात छोट्या मोठ्या चोऱ्या रोजच होत आहेत. हे चोरटे अनेक क्लुप्त्या काढून नागरिकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अनेकदा पोलिसांना संशयितांना शोधणे देखील कठीण जाते. कधी फोन करण्याच्या बहाण्याने, कधी नागरिक फोनवर बोलत असताना, कधी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने, कधी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरटे मोबाईल फोन घेऊन पोबारा करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जात असताना, अनोळखी व्यक्तीकडे मोबाईल देताना सावधगिरी बाळगा किंवा रस्त्याने जाताना मोबाईलवर बोलत असल्यास काळजीपूर्वक इतरही हालचालींवर लक्ष ठेवा. अन्यथा मोबाईल चोरी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले आहे.