Mumbai Crime : झोमॅटो बॉय डिलिव्हरीच्या नावाखाली रस्त्यावर करायचा मोबाईल चोरी, टिळकनगर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Mumbai Crime : हॉटेलमधील जेवणाच्या पार्सलची डिलिव्हरी करत रस्त्याने मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या एका झोमेटो डिलिव्हरी बॉयला मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी गजाआड केलं आहे.
Mumbai Crime : हॉटेलमधील जेवणाच्या पार्सलची डिलिव्हरी करत रस्त्याने मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या एका झोमेटो (Zomato) डिलिव्हरी बॉयला (Delivery Boy) मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी गजाआड केलं आहे. नदीम नसीम अख्तर खान असे या चोरट्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. 24 मे रोजी नदीम नसीम अख्तर खानने एका रस्त्यावरुन जाणाऱ्या एका महिलेचा आयफोन (iPhone) खेचून पळ काढला होता. यानंतर महिलेने टिळकनगर पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी तपास सुरु केला. सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकल्या.
काय आहे प्रकरण?
झोमॅटोचा आरोपी डिलिव्हरी बॉय नदीम नसीम अख्तर खान हा जेवणाची डिलिव्हरी करता करता रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांचे मोबाईल फोन हिसकावून घेऊन पळ काढायचा. अशाच प्रकारची चोरी त्याने 24 मे रोजी केली. परंतु त्याच्या या चोरीमुळे त्याला गजाआड व्हावं लागलं. पल्लवी भन्साळी नावाची महिला 24 मे रोजी एमजी रोडवरुन जात होती. याचवेळी या झोमॅटो डिलिव्हरी बॉयने त्यांचा हातातील आयफोन खेचून घेऊन पळ काढला होता. या महिलेने टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या चोराचा शोध सुरु केला.
पोलिसांनी आरोपी डिलिव्हरी बॉयला कसं शोधलं?
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन आरोपी ज्या मार्गाने गेलेला आहे त्या मार्गावरील दुकानांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यादरम्यान आरोपी डिलिव्हरी बॉय गोवंडी इथल्या हायपर किचन या हॉटेलच्या ठिकाणी एक पार्सल घेऊन जात असताना दिसून आला. तेव्हा तेवढ्या वेळात किती पार्सलची डिलिव्हरी, कोणामार्फत झाली याचा तपास केला असता चार संशयित इसमांची नावे समोर आली. त्यामधील सर्वांची फेसबुक, व्हाट्सअॅप प्रोफाईल तपासणी केली असता नदीम खान याचा प्रोफाइल फोटो जुळून आला. त्यानंतर त्याच्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन प्राप्त करुन त्याला गोवंडी इथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा कबूल केला. तसंच त्याच्याकडून पंतनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले. तसंच गुन्ह्यातील दुचाकी ही ताब्यात घेतली. झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या आडून त्याने असे अनेक गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे.
हेही वाचा
Video : कौतुकास्पद! दिव्यांग डिलिव्हरी एजंटचं धाडस पाहून तुम्हीही थक्क व्हाल; पाहा व्हिडीओ