नाशिकच्या उमेदवारी आधीच मराठा समाजाकडून विरोध, छगन भुजबळ म्हणाले, मी मराठ्यांना विरोध केलाच नाही!
Nashik Lok Sabha : छगन भुजबळांना नाशिक लोकसभा मतदारसंघावर उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने मराठा समाजाकडून भुजबळांना विरोध केला जात आहे. यावर छगन भुजबळांनी भाष्य केले आहे.
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) शड्डू ठोकला होता. त्यामुळे मराठा समाजाकडून छगन भुजबळांना गेल्या काही दिवसांपासून विरोध सुरु आहे. त्यातच आता छगन भुजबळांना नाशिक लोकसभा मतदारसंघाची (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारी मिळण्याचे संकेत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून छगन भुजबळांविरोधात होर्डिंग्स लावण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळांना विरोध करण्यात आला. मराठ्यांच्या मुलांचा तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळांना गाडण्यासाठी उमेदवार द्यायचा, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
मी मराठ्यांना कधीच विरोध केला नाही
छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या नावाचे होर्डिंग लावण्यात आले. मी मराठ्यांना कधीच विरोध केला नाही. मी आरक्षणाला समर्थन केले आहे. मराठा आरक्षण ओबीसीमधून नको, मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, अशी आमची मागणी होती. आमची मागणी मान्य झाली आहे. ही माझी चूक असेल तर मी ती चूक केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
असा बोर्ड लावून मराठा समाजाचेच नुकसान
होर्डिंग बाबत भुजबळ म्हणाले की, असे होर्डिंग का लावतात? मला माहित नाही. निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होऊ द्या. पंकजा मुंडे यांना अडवले. त्या तर काहीच बोलल्या नाहीत. प्रणिती शिंदे या कधी मराठा समाजाविषयी बोलल्या आहेत का? त्यांना का विरोध केला गेला. असा बोर्ड लावून मराठा समाजाचे नुकसान होणार आहे. राज्यभर चांगले मराठा समाजाचे नेते आहेत. त्यांच्या विरोधातदेखील बोर्ड लागतील, असे त्यांनी म्हटले आहे.
भुजबळांविरोधात मराठा समाज उमेदवार देणार
एकीकडे छगन भुजबळ नाशिक लोकसभा लढवण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे भुजबळांच्या विरोधात सकल मराठा समाज निवडणुकीच्या उमेदवार देण्यात येणार आहे. मराठा समाजाकडून उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली जात आहे. याबाबतचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांना पाठवण्यात येणार आहे. आता मराठा समाज कोणता उमेदवार देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
नाशिकची जागा सोडणार नाही! शिंदे गट पुन्हा आक्रमक; भुजबळांच्या 'त्या' वक्तव्याने वाद वाढला...