Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना धमकीचं पत्र नेमकं कुठून आलं? समोर आली मोठी अपडेट
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे भुजबळांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे.
Chhagan Bhujbal नाशिक : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला (Maratha Reservation) छगन भुजबळांनी कडाडून विरोध केल्यामुळे ते राज्यात चांगलेच चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना त्यांच्या नाशिक (Nashik) येथील कार्यालयात पत्राद्वारे पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. छगन भुजबळांच्या नाशिक येथील निवासस्थानी मोठा पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
'तुम्हाला उडवण्याची तयारी सुरू असून त्यासाठी पाच व्यक्ती नाशिकमधील दिंडोरी, चांदशी येथे थांबले आहेत', त्यांनी ५० लाख रुपयांची सुपारी घेतली आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःला जपा, असे पत्र भुजबळ फार्म येथे पोस्टाने आले आहे. हे पत्र संबंधित व्यक्तीने पोस्टाच्या नियमानुसार टाकले असून त्याने त्याच्या पहिल्या नावाचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे.
धमकीचे पत्र तिडके कॉलनीतील पोस्टातून
छगन भुजबळ यांच्या नावाने आलेले धमकीचे पत्र तिडके कॉलनीतील पोस्ट कार्यालयातून आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोस्टात हे पत्र कुणी व कधी दिले, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दुसरीकडे हे पत्र मिळाल्यावरही भुजबळ यांच्याकडून पोलिसांत अद्याप तक्रार दाखल झाली नाही.
भुजबळांच्या घराबाहेर अतिरिक्त बंदोबस्त
भुजबळांना हे पत्र मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेने परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी भुजबळांसह फार्मच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानुसार अंबडचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी भुजबळ फार्म येथे अंबडसह शहर पोलीस मुख्यालयाचे दहा अंमलदार अतिरिक्त बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत.
सीसीटीव्हीनुसार तपास
हे पत्र संशयिताने तिडके कॉलनीतील पोस्टात दाखल केले. पोस्टाने कामकाजानुसार ते फार्म येथे पोहोच केले. त्यामुळे ते पत्र कधी व कुणी टाकले, याचा सीसीटीव्हीनुसार तपास केला जाणार आहे. पत्र केवळ व्हॉटस्अॅपवर आम्हाला मिळाले आहे. संबंधितांकडून अद्याप तक्रार आली नसून पोलीस बंदोबस्तात वाढ केल्याचे मोनिका राऊत यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले भुजबळ?
गेल्या काही महिन्यात चार ते पाच वेळा धमकीचे पत्र मेसेज आणि फोन आले आहेत. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. आयुष्यात अनेकवेळा असे प्रसंग आले आहेत. हे प्रसंग पोलिसांकडे सोपवून द्यायचे असतात. आपली भूमिका सोडणार नाही जे व्हायचे ते होईल. गाड्याचे नंबर, मोबाईल नंबर आहेत, ज्या हॉटेलसमोर मिटिंग झाली ती माहिती पोलिसांना दिली आहे. कशासाठी आहे हे धमकी देणाऱ्यांना पकडल्यानंतर कळेलच. काहीही झाले तरी मी माझी भूमिका सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
आणखी वाचा