(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Balasaheb Thorat : 'लाडकी सत्ता मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड'; बाळासाहेब थोरात अजितदादांवर कडाडले!
Balasaheb Thorat on Ajit Pawar : लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी यांच्या पुढील बटण दाबावं लागेल, याचा अर्थ यांना लाडकी बहीण नाही, सत्ता हवी आहे, असे बाळासाहेब थोरातांनी म्हटले आहे.
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) नाशिकपासून सुरु झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) बोलताना ही योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमचे बटण दाबले पाहिजे. तुम्हाला निवडणुकीत महायुतीचे बटण दाबायचे आहे. तिन्ही पक्षाचे बटण दाबू नका. एकच पक्षाचं बटण असणार आहे. महायुतीच्या पक्षाचं बटण दाबा, असे वक्तव्य केले. आता यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अजित पवारांसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
लाडकी सत्ता मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड
बाळासाहेब थोरात म्हणाले की, लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी यांच्या पुढील बटण दाबावं लागेल याचा अर्थ असा यांना लाडकी बहीण नाही, सत्ता हवी आहे. ही लाडकी सत्ता मिळवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे. मात्र हे सगळं जनता ओळखून आहे, असे हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेत सर्वत्र गुलाबी रंग दिसत आहे. यावरूनदेखील बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना डिवचले आहे. रंग गुलाबी करून काय उपयोग आहे? लोकांनी सगळं तुमचं अनुभवलेलं आहे. त्याचा ठसा एवढा उमटलेला आहे की आता गुलाबी करून काही होईल, असं मला वाटत नसल्याची टीका बाळासाहेब थोरातांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या मताधिक्क्याने जिंकू
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्ही दोन दिवसांपूर्वी काही चर्चा केल्या आहेत. प्रामुख्याने निकष कसे असावे? काय असावे? याबाबत प्राथमिक चर्चा आम्ही केली आहे. त्या पद्धतीने पुढच्या बैठकीत आम्ही आणखी चर्चा करू, लवकर जाग निश्चित होतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 288 जागा लढू. त्यामध्ये मित्र पक्षांचाही सहभाग असेल. विधानसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या मताधिक्क्याने जिंकू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारचं नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
नाशिक-मुंबई महामार्गाच्या अवस्थेवर बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिक-मुंबई हा प्रवास तीन तासात आपण करायचो. आता पाच-सहा तास लागतात. कधी कधी एकाच जागेवर पाच तास लागतात, खड्डे असतात ट्राफिक असते. इतकी वाईट परिस्थिती कधीही पाहिली नव्हती. सरकारचं नागरिकांच्या प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यांना केवळ मतांचे पडले आहे, सत्तेचे पडलेले आहे. ते यातच गुंतलेले आहेत. मागच्या वर्षी मी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सांगितले की, 31 मार्चपर्यंत पूर्णपणे रस्ता चांगला करू. यावर्षी पुन्हा हा प्रश्न उपस्थित केला तर त्याचे उत्तर अजून सापडलेलं नाही. शासन म्हणून नियंत्रण पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. या परिस्थितीवर नाशिककर आणि मुंबईकर प्रचंड नाराज आहेत, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
'मी उगाच गुलाबी स्वप्न दाखवत नाही, माझ्यात स्वप्न पूर्ण करण्याची धमक'; अजित पवारांचं नाशकात वक्तव्य