(Source: Poll of Polls)
Bail Pola : नदी नाले कोरडे ठाक, बैल धुवायला येवल्याच्या शेतकऱ्यानं गाठलं सर्व्हिस स्टेशन
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी बैल धुण्यासाठी थेट सर्व्हिस स्टेशन गाठल्याचे पाहायला मिळाले.
Bail Pola : आज बैलपोळ्याचा (Bail Pola) सण आहे. मात्र, या सणावर दुष्काळाचं सावट आहे. पाऊस नसल्यामुळं नदी नाले कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. बैलपोळ्याला बैलांना धुण्यासाठी नदीत पाणी देखील नाही. त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी बैल धुण्यासाठी थेट सर्व्हिस स्टेशन गाठल्याचे पाहायला मिळाले.
यावर्षीच्या बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशातच आज आज बैलपोळ्याचा सण आहे. आजचा दिवस हा शेतकऱ्यांच्या लाडक्या सर्जा राजाचा दिवस आहे. मात्र,या बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी बैलांना अंघोळ घालण्यासाठी पाणीच नसल्यानं नाशिकच्या येवल्यातील शेतकऱ्यांनी बैलांना अंघोळ घालण्यासाठी थेट सर्व्हिस स्टेशन गाठले आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाची उघडीप, नदी नाले कोरडे
नाशिकच्या ग्रामीण भागातील येवला, नांदगाव आदी भागात पावसाने ओढ दिली आहे. या ठिकाणचे नदी, नाले कोरडे पडले आहेत. तर धरणांनी देखील तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत वर्षातून एकदा येणारा पारंपारिक सण साजरा करायचा तरी कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. पाणी नसल्यामुळं शेतकऱ्यांनी थेट सर्व्हिस स्टेशनवर जावून आपल्या बैलांना अंघोळ घातली.
दुष्काळजन्य परिस्थिती आणि वाढत्या महागाईमुळं शेतकऱ्यांची बाजाराकडं पाठ
यावर्षी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. पावसाळा सुरु होऊन तीन महिने झाले तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण त्यांची खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. तर काही ठिकाणी खरीपाची पिकं वाया देखील गेली आहेत. याचा परिणाम पोळा सणावर देखील झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दरवर्षी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट केली जाते. पण यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती आणि वाढती महागाई यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांनी जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतल्याने यंदा बाजारात थंड प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या वर्षी बैलपोळ्यावर लम्पीचा परिणाम दिसून येत आहे. यामुळे प्रशासनाने पोळ्याच्या दिवशी बैल एकत्रित आणणे, बैलांची मिरवणूक काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे. बैलांच्या मिरवणुकीच्या वेळी अनेक पशुधन एकत्र येत असतात आणि त्यातून रोगाचा प्रसार होऊ शकतो हे टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: