Nashik News : 'मनात आलं की संप करायचा हे चालणार नाही', व्यापाऱ्यांवर निर्बंधासाठी नियमावली; अब्दुल सत्तार यांची महत्त्वाची घोषणा
Nashik News : मार्केटिंग फेडरेशनला उतरवून कांदा खरेदी करु, म्हणजे व्यापाऱ्यांनी संप केला तरी शेतकऱ्यांना अडचण येणार नाही, अशी भूमिका मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक : 'कांदा व्यापारी (Onion traders) अचानक संप करुन शेतकऱ्यांना भेटीस धरत आहेत आणि त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा (Onion Crop) सडायला लागला आहे. त्यामुळे आम्ही लवकरच या व्यापाऱ्यांवर निर्बंधासाठी नियमावली करत आहोत. मनात आलं की संप करायचा हे चालणार नाही. आम्ही मार्केटिंग फेडरेशनला उतरवून कांदा खरेदी करु. म्हणजे संप जरी व्यापाऱ्यांनी केला तरी शेतकऱ्यांना अडचण येणार नाही, अशी भूमिका पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी व्यक्त केली आहे.
कांदा व्यापारी वर्गाने गेल्या बुधवारपासून संप (Onion Traders Strike) पुकारला असून कांदा लिलाव ठप्प आहेत. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या बैठकीत तोडगा निघू शकलेला नाही. त्यानंतर व्यापाऱ्यांनी बैठक घेतली, मात्र आपल्या निर्णयावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करावे यासह विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा आज सातवा दिवस आहे.
अब्दुल सत्तार यांचा कांदा व्यापाऱ्यांवर निशाणा
तत्पूर्वी अब्दुल सत्तार यांनी व्यापाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 'मनात आलं की संप करायचा हे चालणार नाही, व्यापाऱ्यांवर निर्बंधासाठी नियमावली करत असून आम्ही मार्केटिंग फेडरेशनला उतरवून कांदा खरेदी करु, अशी घोषणा अब्दुल सत्तार यांनी केली आहे. तसेच अब्दुल सत्तार यांनी नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) कांद्याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, "केंद्राला कधी कोणता कांदा मार्केटमध्ये उतरवायचा हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफ कांदा मार्केटमध्ये उतरवणं बंद करा. ही मागणी मान्य होणारी नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी 460 कोटी रुपये तरतूद केली असून 31 मार्च पूर्वीची रक्कम देण्यात येईल, तसेच 360 रुपये प्रति क्विंटल रक्कम लवकरच देण्यात येईल." अब्दुल सत्तार यांनी कांदा अनुदानाबाबत महत्वपूर्ण घोषणा करत 350 ऐवजी आता 360 रुपये कांदा अनुदान देण्यात येईल, असं जाहीर केलं.
कांदा प्रश्नावर मंत्रिमंडळाची बैठक
दरम्यान आज कांदा प्रश्नावर मुंबईत (Mumbai) मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून थोड्याच वेळात बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीसाठी नाशिकहून (Nashik) कांदा व्यपारी मुंबईला गेले आहेत. तर मुंबईतील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित आहेत. या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होतो तसंच मात्र अब्दुल सत्तार यांनी केलेल्या घोषणेमुळे काय परिणाम होतो हे पाहावे लागणार आहे.
इतर महत्वाची बातमी :