Nashik Crime News: इगतपुरी तालुका हादरला; दारूला पन्नास रुपये दिले नाही म्हणून पतीनं पत्नीला संपवलं
Nashik News : मी तुझ्या आईला मारून टाकलं, तुला काय करायचं ते कर, असं नवऱ्याने बायकोला संपवल्यानंतर मुलाला सांगितलं.
Nashik News : नाशिक (Nashik) शहराबरोबर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असून इगतपुरी तालुक्यात (Igatpuri) धक्कादायक घटना घडली आहे. दारूला पन्नास रुपये दिले नाही म्हणून बायकोचा खून करण्यात आल्याची घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे. वाडीवऱ्हे परिसरातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात एक दोन दिवस खुनाच्या (Murder) घटनेला उलटत नाही, तोच दुसरी खुनाची घटना समोर येत आहे. त्यामुळे नाशिक शहर पोलिसांसह ग्रामीण पोलिसांसमोर गुन्हेगारीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एक गुन्हा उलगडत नसताना दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. अशातच इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात वाडीवऱ्हे परिसरातील सांबरवाडी, गणेश वाडी येथे दारू पिण्यासाठी बायकोने 50 रुपये दिले नाही. त्याचाच राग आल्याने दारुड्या नवऱ्याने लोखंडी रॉडने बायकोला संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरातील सांबरवाडी येथील लालू सोपान मोरे हा आपल्या बायको, मुलगा आणि सून यांच्यासोबत राहतो. तर मुलगा राकेश सोपान मोरे हा मासे परिसरात विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, काल रात्री वडील लालू सोपान मोरे दारू पिऊन घरी आले होते. त्यांनी पत्नी मीराबाईकडे दारू पिण्यासाठी 50 रुपये मागितले. मात्र तिने नकार देताच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
प्रारंभीचा वाद झाल्यानंतर वडील काही वेळात घरातून निघून गेले. त्यानंतर आम्ही सर्वानी जेवण करून झोपण्यासाठी बाहेर गेलो, मात्र आई घरात एकटीच झोपल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान त्यानंतर रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान वडील लालू सोपान मोरे घरी आले, त्यांनी घरात जाऊन आतून दरवाजा लावून घेतला. सायंकाळच्या भांडणाचा राग आणि दारूला पैसे न दिल्याचा राग मनात धरून त्याने पत्नी मिराबाई लालू मोरेशी पुन्हा वाद घातला. यावेळी मारहाण करत लोखंडी मुसळीने लालू मोरेने तिच्या डोक्यावर, तोंडावर जोरदार वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिचा आवाज ऐकून मुलगा आणि सून दरवाजा वाजवू लागले.
काही वेळाने लालू याने स्वतःच दरवाजा उघडून मुलाला, मी तुझ्या आईला मारून टाकलं, तुला काय करायचं ते कर, असं सांगितलं. राकेशने लगेच 108 नंबरला कॉल करून ॲम्बुलन्स बोलावून घेतली. ॲम्बुलन्समधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मीराबाई यांना मृत घोषित केले. या प्रकारानंतर तात्काळ वाडीवऱ्हे पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.