Nashik News : सिन्नरचा सहाय्यक निबंधक एसीबी ट्रॅपमध्ये अडकला, पंधरा हजारांची लाच घेताना अटक
Nashik News : सिन्नरमध्ये वसुली दाखले देण्यासाठी सहाय्यक निबंधकाने लाच घेतल्याची घटना समोर आली आहे.
Nashik News : नाशिकसह जिल्ह्यात अनेक भागातील सरकारी कार्यालये जणू लाचखोरीची केंद्रे बनत चालली आहे. दिवसेंदिवस लाचखोरीचे प्रकरण समोर येत असल्याने प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आता सिन्नर शहरातील सहकार विभागातील सहाय्यक निबंधकास (Assistant Registrar) साडे पंधरा हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात लाचखोरीचे (Bribe) प्रकरण सातत्याने समोर येत आहेत. दर एक दिवसाआड एक लाचखोरीचे प्रकरण समोर येत असल्याने लाचखोरी किती खोलवर पसरलेली आहे, हे दिसून येते. मागील काही दिवसांची आकडेवारी बघता दर दिवसाआड नाशिक जिल्ह्यात एक लाचखोरीचे प्रकरण समोर येत आहेत. अशातच आज सिन्नर (sinner) येथील सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांना 15 हजार 500 रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान यातील तक्रारदार सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील साई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत वसुली विभागात काम करतात. थकीत 17 कर्जदारांचे 101 चे वसुली दाखले मिळण्यासाठी पाटील यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले होते. पाटील यांनी प्रत्येक प्रस्तावाचे 2 हजार याप्रमाणे 34 हजारांची मागणी संबंधित सेवकाकडे केली होती. मात्र तडजोडीनंतर 25 हजार 500 रुपये देण्याचे संबंधित सेवकाने मान्य करीत 26 फेब्रुवारीला 10 हजार रुपये पाटील यांना दिले होते. दाखले तयार झाल्यानंतर उर्वरित 15 हजार 500 रुपये देत नसल्याने पाटील यांनी दाखल्यांवर सही करण्यास नकार दिल्यानंतर संबंधित सेवकाने बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती.
त्यानुसार लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर बुधवारी संबंधित सेवकाने पुन्हा पाटील यांची भेट घेऊन 15 हजार 500 रुपये उद्या देण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार आज दुपारी सव्वा वाजेच्याच्या दरम्यान सरकारी पंचांच्या समोरच पाटील यांनी 15 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या रकमेसह पाटील यांना ताब्यात घेतले. आज सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाची माघारीची अंतिम मुदत होती. पाटील हेच या संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यामुळे कार्यालयात माघारीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होती. या गर्दीतच ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर केबिनचा दरवाजा आतून बंद करून पाटील यांच्यासह त्यांच्या टेबल व बॅगची झडती घेण्यात आली. त्यानंतर पाटील यांना घेऊन लाचलुचपतचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहावर जबाब घेण्यात आला.
एक दिवसाआड एक लाचखोर अटकेत
सरकारी कार्यालयांमध्ये सध्या भ्रष्टाचाराची किड मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र आहे. हे दाखवणारी एक आकडेवारी नाशिक विभागात समोर आली आहे. 2023 सालच्या गेल्या 57 दिवसात तब्बल 28 लाचखोर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकरण सातत्याने समोर येत आहेत. दर एक दिवसाआड एक लाचखोरीचे प्रकरण समोर येत असल्याने लाचखोरी किती खोलवर पसरलेली आहे, हे दिसून येते.