मुख्यमंत्र्यांची भेट का घेणार? शिंदे गटाच्या नाशिक जिल्हाप्रमुखांनी सांगितलं नेमकं कारण!
Ajay Boraste will meet Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख ठाण्यात दाखल झाले आहेत. ते आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.
Ajay Boraste : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) तिढा महायुतीत अद्याप कायम आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु असताना महायुतीकडून पर्यायी उमेदवाराचा शोध सुरु आहे. नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे. आज अजय बोरस्ते ठाण्यात पोहोचले असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चैत्र नवरात्रोत्सवाला मी ठाण्यातील कोपरी परिसरात दरवर्षी येतो. मागच्या वर्षीदेखील नगरसेवकांना घेऊन आलो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटल्याप्रमाणे देशात 400 पार आणि महाराष्ट्रात 45 प्लस जागा निवडून येण्यासाठी देवीकडे साकडे मागितले आहे. तसेच बाळासाहेबांचा आणि रामाचा धनुष्यबाण आहे. तो टिकलाच पाहिजे. यासाठी काम करायचे बळ दे, एवढीच मागणी देवीकडे केली, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
उत्तर महाराष्ट्राचे शिवसेनेचे अस्तित्व नाशिकच्याच जागेवर अवलंबून
नाशिकच्या उमेदवारीबाबत अजय बोरस्ते म्हणाले की, नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला (Shiv Sena) मानणारा आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भेटीत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही जागा शिवसेनेसाठी कशी महत्त्वाची आहे, यासंदर्भात सांगणार आहोत.पुढील निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असेल. उत्तर महाराष्ट्राचे शिवसेनेचे अस्तित्व नाशिकच्याच जागेवर अवलंबून असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
ठाण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदेंची भेट झालीच पाहिजे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट का घेणार आहात? अशी विचारणा केली असता अजय बोरस्ते म्हणाले की, मंदिरात आल्यानंतर देवाचे दर्शन झाले पाहिजे. त्याप्रमाणे ठाण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट झालीच पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोणी असेल तरी मोदींना पंतप्रधान करणे महत्त्वाचे
महायुती धर्म पळणार का? याबाबत अजय बोरस्ते म्हणाले की, महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. हेमंत गोडसे किंवा छगन भुजबळ यांच्याबरोबर संबंध चांगले आहेत. त्यामुळे कोणी असेल तरी मोदींना पंतप्रधान करणे महत्त्वाचे आहे. हेमंत गोडसे यांच्यासाठी आम्ही गेले 15 दिवस प्रयत्न करत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे. तसेच शिवसैनिकांना कामाला लागा हे सांगावं लागत नाही. 24 तास आम्ही रस्त्यावर असतो. आता निवडणुका आल्या आहेत. त्या दृष्टीने साहेबांनी कामाला लागा, असा दिल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा