Nashik Loksabha : बोरस्तेंपाठोपाठ हेमंत गोडसेही मुंबईकडे रवाना, नाशिकच्या उमेदवारीबाबत केलं महत्वाचं वक्तव्य
Hemant Godse : शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आज मुंबईत पोहोचले आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता हेमंत गोडसे देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत.
![Nashik Loksabha : बोरस्तेंपाठोपाठ हेमंत गोडसेही मुंबईकडे रवाना, नाशिकच्या उमेदवारीबाबत केलं महत्वाचं वक्तव्य Hemant Godse left for Mumbai After Ajay Boraste to meet Eknath Shinde Nashik Lok Sabha Election 2024 Mahayuti Seat Sharing Maharashtra Politics Marathi News Nashik Loksabha : बोरस्तेंपाठोपाठ हेमंत गोडसेही मुंबईकडे रवाना, नाशिकच्या उमेदवारीबाबत केलं महत्वाचं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/c5a9d00bc988b44becd153fd51f737861712913256898923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे हेमंत गोडसे (Hemant Godse) तर दुसरीकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिक लोकसभेसाठी आग्रही आहेत. मात्र दोघांच्या नावाची नाराजी असल्याने महायुतीकडून पर्यायी उमेदवारांचा शोध घेतला आहे.
महायुतीकडून भाजपचे आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांच्या नावाची चाचपणी करण्यात आली आहे. तर आज सकाळी अजय बोरस्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
बोरस्तेंपाठोपाठ गोडसेही मुंबईत रवाना
आता अजय बोरस्ते यांच्या पाठोपाठ हेमंत गोडसेदेखील मुंबईकडे रवाना झाले आहेत. हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अजून कायम असल्याचे चित्र आहे.
बोरस्ते हे माझ्या उमेदवारीची मागणी करणार
हेमंत गोडसे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता ते म्हणाले की, महायुतीच्या उर्वरित जागांचे वाटप लवकर करा, अशी मागणी आम्ही वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहोत. मुख्यमंत्री किंवा इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहोत. अजय बोरस्ते आरती करण्यासाठी ठाण्याला गेले आहेत. बोरस्ते हे माझ्या उमेदवारीची मागणी करणार आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
मुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते सांगतील त्याला आमचा पाठिंबा
नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार? यावर हेमंत गोडसे म्हणाले की, महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला आम्ही मदत करणार आहोत. जागा शिवसेनेला मिळावी ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते सांगतील त्याला आमचा पाठिंबा असेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
नाशिकचा तिढा नेमका कधी सुटणार?
दरम्यान, एकीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजाभाऊ वाजे यांनी त्यांच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महायुतीत मात्र नाशिकचा तिढा अजूनही कायम आहे. महायुतीकडून नाशिक लोकसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार? नाशिकचा तिढा नेमका कधी सुटणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)