नाशिक, प्रवरा, उजनी आणि राज्यात 23 जणांचा बुडून मृत्यू, सात दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला!
गेल्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात सहा दुर्घटना घडल्या आहेत. नाशिक, प्रवरा, उजनी आणि राज्यात एकूण 23 जणांचा बुडून मृत्यू झाला असून यामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात सात दुर्घटना घडल्या आहेत. यात 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सर्वांचाच बुडून मृत्यू झाला आहे. उजनी धरणात बोट दुर्घटनेत (Ujani Dam Boat capsizes) सहा जण बुडाले. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात (Bhavali Dam) बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातच विहिरीत पडून मायलेकीचा मृत्यू झाला. तर प्रवरा नदीत (Pravara River) पोहायला गेलेले दोन जण बुडाले. त्यांच्या शोधकार्यासाठी गेलेल्या एसडीआरएफची बोट (SDRF Boat) उलटल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. पुण्यात (Pune) आजोबांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावंडाचा बुडून मृत्यू झाला तर बीडमध्ये (Beed) दोन मुलांसह महिलेचा बुडून मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. या घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे.
उजनी बोट दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू
इंदापूर तालुक्यातील डोंगरे व जाधव कुटुंब अजोती येथे पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला 21 मे रोजी निघाले होते. प्रवासी कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणाऱ्या बोतेने प्रवास करत होते. अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला. त्यामुळं रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले आणि बोट जागेवर फिरली. यामध्ये सहा प्रवाशी बुडाले होते. गेल्या दोन दिवसांपासून उजनी धरणात मृतदेह शोधले जात होते. आज सहावा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. तब्बल 40 तासांच्या शोध मोहीमेनंतर उजनीत धरणातील शोधकार्य थांबवण्यात आले आहे. गोकूळ दत्तात्रय जाधव (30), कोमल गोकूळ जाधव (25), शुभम गोकूळ जाधव (दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (3), अनुराग अवघडे (35), गौरव डोंगरे (16) अशी मृतांची नावे आहेत.
भावली धरणात पाच जण बुडाले
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरण (Bhavali Dam) परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पाच जणांचा धरणात बुडून (Drown) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. मृतांमध्ये तीन मुलींसह दोन तरुणाचा समावेश आहे. हे सर्वजण नाशिकरोड (Nashikroad) येथील गोसावीवाडीतील रहिवासी आहेत. या घटनेमुळे गोसावीवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. हनिफ शेख, अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16) आणि ईकरा दिलदार खान (14) अशी मृतांची नावे आहेत.
इगतपुरीतील दुसरी घटना
मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत विवाहित महिलेसह मुलीचा मृतदेह आढळून आला. प्रियंका नवनाथ दराणे (23) आणि वेदश्री नवनाथ दराणे (03) असे मृत्यू झालेल्या मायलेकींचे नाव आहे.
प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटली, चार जणांचा मृत्यू
प्रवरा नदीत दोन तरुण पोहण्यासाठी आले असता दोघेही पाण्यात बुडाले. यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याला शोधण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र एसडीआरएफची बोट शोधकार्य सुरु असताना अचानक उलटली. या बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक नागरिक बुडाला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात दोन सख्या भावंडांचा बुडून मृत्यू
पुणे जिल्ह्यातील पाबळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. आजोबांसोबत शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोघांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्यन नवले आणि आयुष नवले, अशी साधारण तेरा वर्षीय बुडालेल्या मुलांची नावं आहेत. एकाच वेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने नवले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. यांच्या जाण्याने पाबळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यात दोन मुलांसह महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनपुर (ता.अंबाजोगाई) येथील महिलेचा दोन मुलांसह विहिरीत बुडून मृत्यू झाला. द्रौपदी संतोष गोईनवाड, पूजा (7), सुदर्शन (7) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागपूर जिल्ह्यात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
नागपूर येथील वाठोडा परिसरातील काही मित्र फिरायला आले होते. तलावात पोहायला गेलेल्या विनीत राजेश मनघटे (18) या तरुणाचा मृत्यू झाला. आज गुरुवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. गावातील पोहणाऱ्या तरुणांनी मृतदेह बाहेर काढला.
आणखी वाचा