Nandurbar News : रुग्णाला नदीतून बांबूच्या झोळीने उपचारासाठी नेण्याची वेळ; जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समोरच घडलं सगळं; नंदुरबारमधील भीषण वास्तव
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या केलखाडी पाड्यात मूलभूत सुविधांचा अभाव अजूनही कायम असल्याचे दिसून येते.

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या केलखाडी पाड्यात (Kelkhadi Pada) मूलभूत सुविधांचा अभाव अजूनही कायम असून एक गंभीर घटना याच गोष्टीची साक्ष देणारी ठरली आहे. केलखाडी पाड्यात नुकतीच एक सर्पदंशाची घटना घडली असून रुग्णाला वेळेत रुग्णालयात (Hospital) पोहोचवण्यासाठी नातेवाईकांनी बांबूची झोळी करत त्याला उपचारासाठी नेल्याची दिसून आले आहे.
सर्पदंश झालेला रुग्ण गंभीर अवस्थेत असताना नदी पार करताना पाण्याचा जोर आणि खोल वाहत्या प्रवाहामुळे नातेवाईकांची दमछाक झाली. हे सगळं सुरू असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण कुमार गावाच्या भेटीवर आले होते. त्यांच्या समोरच ही घटना घडल्याने परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना
घटनेनंतर मुख्याधिकारी श्रावण कुमार यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रुग्णाला आवश्यक औषधोपचार तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. मात्र, ही एक वेळची उपाययोजना असून, खऱ्या अर्थाने उपाय म्हणजे या भागाला कायमस्वरूपी दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देणे आहे. केवळ केलखाडीच नव्हे तर अक्कलकुवा, धडगाव, शहादा आदी परिसरातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. पावसाळ्यात तर ही समस्या अधिक बिकट होते. पूल नसल्याने शाळकरी मुले, रुग्ण, गर्भवती महिला यांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ठाण्याविहिर पाडा ते केलखाडी पाडा दरम्यान केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाण्यासाठी सुरक्षित व कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध होणार आहे. हा अवर्गीकृत रस्ता ठाण्याविहिर पाड्यापासून केलखाडी पाड्यापर्यंत 5 किमीचा आहे. या मार्गामध्ये केलखाडी पाड्याजवळ केलखाडी नदी येते. पाड्यापासून 1 किमीवर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी दररोज नदी ओलांडून शिक्षणासाठी जात असतात. पावसाळ्यात नदीला पूर येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहत होता. हे लक्षात घेऊन प्रशासनाने या ठिकाणी 15 मीटर लांबीचा साकव बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी अंदाजे 40 लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या साकवाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया जलद गतीने राबवून काम तत्काळ सुरू करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आली आहे.
आणखी वाचा




















