आरोग्य विभागाची उदासीनता, नंदुरबारच्या दुर्गम भागात नव्या बाईक अँब्युलन्स पडल्या धूळ खात
दोन वर्षांपूर्वी धडगाव अक्कलकुवा तालुक्यात बाईक अँब्युलन्स देण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासन योग्य नियोजन करत नसल्याने या बाईक अँब्युलन्स धूळ खात पडल्या आहेत.
नंदुरबार: नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्ते नसल्याने मोठ्या अँम्बुलन्स जाणं शक्य नसल्याने या भागातील आदिवासी बांधव बांबूच्या मदतीने रुग्णाला मुख्य मार्गापर्यंत आणतात आणि त्यानंतर त्याला ॲम्बुलन्सने रुग्णालयापर्यंत पोहचवतात. बांबूलन्स अर्थात बांबूच्या जोडीने आणताना वेळ जातो ही बाब लक्षात घेत दोन वर्षांपूर्वी धडगाव अक्कलकुवा तालुक्यात बाईक अँब्युलन्स देण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासन योग्य नियोजन करत नसल्याने या बाईक अँब्युलन्स धूळ खात पडल्या आहेत.
आदिवासी दुर्गम भागातील माता बालमृत्यू कुपोषण आणि उपलब्ध नसलेल्या आरोग्यसेवा या बाबींचा विचार करत दुर्गम भागात गतिमान आरोग्य सेवा मिळावी म्हणून दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाच्यावतीने धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यासाठी बारा बाईक अँब्युलन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाच्या वतीने या बाईक अँब्युलन्सवरील कर्मचाऱ्यांना मानधनची तरतूद तसेच वाहनांच्या मेंटेनेसची तरतूद न केल्याने या गाड्या धूळखात पडून आहेत. एकीकडे रुग्णांच्या समस्यांवर अनेक चर्चा होत असताना प्रशासनाचा हा भोंगळ कारभार दुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचण्यास अडसर ठरत असल्याचे चित्र आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून धडगाव तालुक्यासाठी सहा आणि अक्कलकुवा तालुक्यासाठी चार बाईक ॲम्बुलन्स खरेदीसाठी महाविकास आघाडीच्या काळात निधी देण्यात आला होता. त्यानंतर काही काळ ही ॲम्बुलन्स सेवा व्यवस्थित चालली मात्र जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग यांनी नियोजन न केल्याने बाईक ॲम्बुलन्स धूळ खात पडल्याचे चित्र आहे. सरकार बदलल्यानंतर या बाईक ॲम्बुलन्स आणि चांगल्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी मंत्री आणि धडगाव अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार के सी पाडवी यांनी केला आहे.
एखादी चांगली योजना प्रशासनाचा नियोजन ढासळल्याने आणि त्यात राजकारण आल्याने कशी निरुपयोगी ठरते हे धूळखात पडलेल्या बाईक अँबुलन्सकडे पाहून वाटते. किमान दुर्गम भागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाच्या संदर्भात तरी प्रशासनाने दक्ष राहावं एवढीच अपेक्षा आहे.
अपघातात ‘गोल्डन अवर’ काळात रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी ही सेवा आवश्यक आहे. राज्यातील आदिवासी पाड्यासारख्या दुर्गम भागात रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहचविण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरते. बाईक ॲम्ब्युलन्स तत्काळ उपलब्ध होऊन रुग्णावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात येतात. या बाईक ॲम्ब्युलन्स चालविणारे प्रशिक्षित डॉक्टर असून त्यांच्यासोबत आवश्यक औषधे, श्वसनमार्गावरील उपचारासाठी लागणारी उपकरणे, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असतात.
हे ही वाचा :