Nandurbar News : राज्यात एकाच दिवशी पाठयपुस्तकांचे वितरण; वितरणाचा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा
Nandurbar News : राज्यातील पाठ्यपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले आहे.
Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शाळा सुरू होत असून शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तक वाटपाचे (Books Distribution) नियोजन प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आले असून त्यादृष्टीची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर बालभारतीच्या (Balbharati) वतीने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी या वर्षापासून पुस्तकांमध्ये गृहपाठ आणि नोंदीसाठी कोरी पाने दिल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे.
15 जूनपासून जिल्ह्यातील शाळा (Nandurbar School) सुरू होणार असून शासनाच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीकडून प्राप्त झालेली मोफत पुस्तके शाळांच्या स्तरावर वितरणाला सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाला प्राप्त पुस्तके पहिल्या टप्प्यात तालुका स्तरावर पोहोचविण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात शाळांपर्यंत पुस्तक पोहोचवण्याची लगबग सुरू झालेली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केली जाणार आहेत. यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ही पुस्तक प्राप्त होणार आहेत. त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली असून मराठी आणि उर्दू भाषेतील शाळांनाही पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर गट शिक्षण अधिकारी सुनिल तावडे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझे कमी करण्यासाठी नेहमीच चर्चा होत असतात. यावर्षी शासनाच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने जोडल्याने, विद्यार्थ्यांना नोंदी आणि गृहपाठासाठी नवीन वह्यांचे ओझे वापरण्याची गरज नसल्याने पाठीवरील ओझे कमी होणार आहे. शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तके तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत पाठीवरचे ओझे कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगला असला तरी ग्रामीण भागातील शासकीय शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी ही आता लक्ष दिलं गेलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यातील अमरावती आणि नागपूर विभाग वगळता इतर जिल्ह्यात एकाच दिवशी पाठयपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. त्यानुसार 31 मे रोजी पाठ्यपुस्तक भांडार स्तरावरून पंचायत समिती स्तरावर पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यानंतर 10 जून रोजी पंचायत समिती स्तरावरून वार्ड स्तरावरून शाळांना दिले जातील. त्यानंतर थेट 15 जून रोजी शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके दिली जाणार आहे. मात्र अमरावती आणि नागपूर विभागासाठी पाठयपुस्तकांच्या वितरणासाठी 26 जून उजाडणार आहे.
वितरणाचा दिवस पुस्तक दिन
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पाठ्यपुस्तक वितरणापूर्वी शाळानिहाय वर्गनिहाय माध्यमनिहाय, पंचायत समिती निहाय पात्र विद्याथ्र्यांची यादी तयार तेहवण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. सदरचा पाठ्यपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे, संपूर्ण जिल्हयात एकाच दिवशी पाठयपुस्तकांचे वितरण होईल, याबाबत नियोजन करण्यात यावे. तालुका स्तरावर पुस्तके प्राप्त झाल्यानंतर ते तात्काळ माध्यमनिहाय, इयत्तानिहाय आणि विषयनिहाय संच वर्गीकरण करून घ्यावेत आणि संबंधित शाळांकडे विनाविलंब वितरण करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.