(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आम्हाला अटक करा! बँड लावत शेतकरी पोहचले थेट पोलीस ठाण्यात; नेमकं काय घडलं?
Nanded News : शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी वाजत-गाजत व कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पोलीस ठाणे गाठले.
नांदेड : अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना (Bhaurao Chavan Cooperative Sugar Factory) कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी वेळेत नेण्यात यावे, अशी मागणी घेऊन गेलेल्या ऊस उत्पादकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmers) हटके आंदोलन करत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी वाजत-गाजत व कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यात दाखल झाले. संतप्त शेतकरी आणि पोलीसांत शाब्दीक बाचाबाची झाली. तसेच, अटकेसाठी स्वत: शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्या होत्या.
नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे ऊस कारखान्यात जात नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे ऊस घेतला जात नसल्याचा देखील आरोप होत आहे. एकीकडे ऊन पडत असून, ऊस वाळत चालला आहे. दुसरीकडे कारखानदार ऊस घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे ऊस घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करत साखर कारखान्याच्या कार्यालयाला कुलूप ठोकले होते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आल्याने, शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने जेल भरो आंदोलन केले. आम्हाला अटक करा म्हणत शेतकरी थेट वाजत-गाजत पोलीस ठाण्यात हजर झाले. शेतकऱ्यांच्या या हटके आंदोलनामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. शेतकऱ्यांच्या या हटके आंदोलनाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
अर्धापूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांचा ऊस गाळपासाठी वेळेत जातो. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस का जात नाही? असा जाब शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. दरम्यान, शेतकरी व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कारखाना वेळेत ऊस नेत नसल्याने शुक्रवारी अर्धापूर शहरातील साखर कारखान्याच्या कार्यालयाला कुलूप ठोकले होते. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा अर्धापूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कारखान्याचे कर्मचारी शिवलिंग विठ्ठलराव रुमणे यांच्या जबाबावरून अर्धापूर पोलीस ठाण्यात कलम 143, 147, 148, 452, 504, 135 नुसार गुन्हा दाखल केला होता. ज्यात भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सरचिटणीस ॲड. रविकिरण शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील राजेगोरे, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष गजानन गव्हाणे पाटील, गंगाधर शिंदे, मोहन जाधव, सुनिल बोंबडे, रामदास गिरे पाटील यांच्या विरूद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांकडून 600 लाख टनांहून अधिक तांदळाची खरेदी, दर कमी करण्यासाठी सरकार उचलणार हे पाऊल