नांदेडच्या लक्ष्मी येडलेवारला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर, विजेचा शॉक लागलेल्या भावाचा वाचवला होता जीव
Nanded: नांदेडच्या लक्ष्मी येडलेवारने विद्युत वाहक तारेचा स्पर्श झालेल्या भावाचा जीव वाचवला होता.
नांदेड: जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावातील लक्ष्मी आनंदा येडलेवार हिला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार (Bal Shaurya Purskar 2023) जाहीर झाला आहे. लक्ष्मी आनंदा येडलेवार ही खतगावच्या सौ. मंजुळाबाई हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. तिने विद्युत वाहक वाहक तारेचा स्पर्श झालेल्या भावाचा जीव वाचवला होता.
महाराष्ट्र राज्य बालकल्याण समितीचे अध्यक्ष आर. के. जाधव आणि कार्यकारिणी सदस्य डॉ. सुशिल नाकोड यांच्या शिफारशीनुसार भारतीय बालकल्याण परिषद, नवी दिल्ली यांच्याकडून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जीवाची पर्वा न करता वाचवले प्राण
बिलोली तालुक्यातील थडीसावळी येथील आनंदा तुकाराम येडलेवार यांची तृतीय कन्या असणाऱ्या लक्ष्मी हिने 21 सप्टेंबर 2021 रोजी तिचा चुलत भाऊ आदित्य याचा जीव वाचवला होता. आदित्यचा विद्युत वाहक तारेला स्पर्श झाला. त्यावेळी आपल्या जीवाची बाजी लावत लक्ष्मीने त्याचे प्राण वाचविले होते.
घरावरील पत्रे अथवा छप्पर वादळी वाऱ्याने आणि पावसाने उडून जाऊ नयेत यासाठी घराच्या पत्रावर तणाव दिलेल्या तारात विद्युत प्रवाह प्रवाहित झाला होता. ज्यात घराच्या अंगणात खेळणारा लक्ष्मीचा चुलत भाऊ आदित्यने त्या ताराला स्पर्श केला आणि त्याला चिटकून बसला. यावेळी लक्ष्मीने स्वतः च्या जीवाची पर्वा न करता, आपल्या जीवाची बाजी लावत भावाचे प्राण वाचवले.
पोलीस निरीक्षकांनी केला होता सत्कार
दरम्यान, या घटनेची बातमी प्रसारमाध्यमातून प्रसारित झाली होती. ही बातमी समजताच रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी थडीसावळी गावात जाऊन सरपंच, ग्रामस्थांच्या उपस्थितीत लक्ष्मीचा सत्कार केला होता. या सत्कारात त्यांनी राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्या विषयी मार्गदर्शन केले होते.
लक्ष्मी येडलेवार ही सौ. मंजुळाबाई हायस्कूल खतगाव येथील शाळेत आठव्या वर्गात शिकत आहे. आपल्या शाळेतील मुलीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल साई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी लक्ष्मीचे अभिनंदन केलं आहे. सदर राष्ट्रीय पुरस्कार 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित केला जाणार आहे.
ही बातमी वाचा: