Nanded News : व्हॉट्सअॅप चॅटवरून वाद झाला, शिवसैनिकावर सहा जणांनी प्राणघातक हल्ला केला
Nanded News : दरम्यान या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nanded News : सोशल मिडीयावर आपली प्रतिक्रिया नोंदवताना अनेकदा वाद होत असतात. विशेष म्हणजे, व्हॉट्सअॅप (Whatsapp) चॅटवरून वाद झाल्याच्या अनेक घटना देखील समोर येतात. असाच काही प्रकार नांदेड जिल्ह्यात (Nanded District) समोर आला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवरील चॅटवरून झालेल्या वादामुळे एका शिवसैनिकावर सहा जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरातील सोमेश कॉलनी परिसरात समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी शिवसैनिकावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. श्रीकांत पाठक हल्ला झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे.
पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, नांदेड शहरातील सोमेश कॉलनी भागातील श्री स्वामी समर्थ मंदिरात ठेवण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मंदिराचे विश्वस्त असताना बॅनरवर नाव न टाकल्याच्या कारणावरून व्हॉट्सअॅप ग्रुपवरील चॅटवरून वाद झाला. त्यानंतर सहा जणांनी शिवसैनिक श्रीकांत पाठक यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना 23 जूनच्या रात्री घडली. ज्यात पाठक हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी सोनाली पाठक यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
नांदेड शहरातील सोमेश कॉलनी भागातील श्री स्वामी समर्थ मंदिरात पिठापुरम येथील स्वामींच्या पादुका येणार होत्या. त्यासाठी मंदिर परिसरात बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर मंदिराचे विश्वस्त आणि प्रतिष्ठित मंडळींची नावे टाकण्यात आली होती. परंतु, विश्वस्त असताना श्रीकांत पाठक यांचे नाव नव्हते. त्यामुळे पाठक यांनी स्वामी समर्थ विश्वस्त ग्रुपवर त्याबाबत जाब विचारला. यावेळी सुनील शर्मा यांच्यासोबत पाठक यांचा ग्रुपवरील चॅटमध्ये वाद झाला. त्यानंतर रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास पाठक हे घरासमोर थांबलेले असताना सुनील शर्मा आणि इतर चार ते पाच जण तिथे आले. त्यांनी पाठक यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पाठक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणात सोनाली पाठक यांच्या तक्रारीवरुन सुनील शर्मासह इतर चार ते पाच जणांविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा तपास सपोनि मुत्यूपोड हे करीत आहेत.
यापूर्वीही झाला होता वाद
विशेष म्हणजे, सोमेश कॉलनीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात राजकारण आणू नका या विषयावरुन पाठक आणि सूनील शर्मा यांच्यात यापूर्वीही वाद झाला होता. मात्र इतरांनी पुढाकार घेत त्यांच्यातील वाद मिटवला होता.
दरम्यान मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर पाठक यांचे फोटो नसल्याने पुन्हा एकदा दोघांमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवरील चॅटमध्ये वाद झाला. त्यात पिठापूरम येथील स्वामींच्या पादुका आणण्यात काँग्रेसने पुढाकार घेतला होता. त्यामुळे शिवसैनिक असलेल्या पाठक यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या :